जिल्हाधिकाऱ्यांचा हा आदेश पाळून ग्रामीण भागात सुरू करता येतील सलून अन् पार्लर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:41 PM2020-05-24T17:41:23+5:302020-05-24T17:44:45+5:30
सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आदेश
सोलापूर : ग्रामीण भागातील सलून आणि ब्युटी पार्लरची दुकाने सुरू करण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी काही नियम व अटी आहेत.
सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असेल. सलूनमध्ये व ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या व्यक्तींसाठी एक रजिस्टर ठेवावे. या रजिस्टरमध्ये ग्राहकांची नोंद करावी. या नोंदीनुसार दुकानदारांनी ग्राहकांना दुकानात येण्याची वेळ सांगावी. एकाचवेळी एकाच ग्राहकाला दुकानात घ्यावे. एकावेळी दुकानात कारागीर आणि ग्राहक अशा दोनच व्यक्तीच असतील याची काळजी घ्यावी. मोठ्या सलून किंवा ब्युटीपार्लरमध्ये दोन खचुीर्मध्ये किमान सहा फुटांचे आंतर असावे. कारागीर आणि ब्युटी पार्लर चालवणाऱ्या पार्लर चालवणाऱ्या व्यक्तींनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक राहील.
सलूनमधील साहित्याचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे. एका ग्राहकाला वापरलेला टॉवेल किंवा अंगावर टाकलेले कापड दुसऱ्या ग्राहकाला वापरु नये. कारागिराने मास्क परिधान न केल्यास प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकाऱ्यांनी तर ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकांनी कारवाई करावी.