संचारबंदीत अन्नाची ओढ; भाकरी आली रे... म्हणत भुकेल्यांची गाडीमागे धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:51 PM2020-04-23T12:51:08+5:302020-04-23T12:54:48+5:30
संचारबंदीत अन्नाची ओढ असणाºया या मंडळींचा मिळेल ते खायचं आणि दिवस काढायचा असा प्रकार सुरू आहे.
संताजी शिंदे
सोलापूर : भाकरी आली रे चला... असे म्हणत भर उन्हात पोटाची भूक भागविण्यासाठी, रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसलेले निराधार अन्न वाटप करणारी गाडी पाहताच पळत सुटले. संचारबंदीत अन्नाची ओढ असणाºया या मंडळींचा मिळेल ते खायचं आणि दिवस काढायचा असा प्रकार सुरू आहे.
मार्च महिन्यात संचारबंदीला सुरुवात झाली. दि. ३१ मार्चपर्यंत जाहीर झालेली संचारबंदी दि. १ एप्रिलपासून १४ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली. नंतर पुन्हा दि. १५ ते ३० एप्रिलपर्यंत ही संचारबंदी वाढली. सुरुवातीच्या काळात बहुतांश सामाजिक संघटनांच्या वतीने निराधारांना अन्नदान करण्यात आले. मात्र हळूहळू अन्नदान करणारे हात आखडते झाले. सध्या बोटांवर मोजण्याइतक्या काही संस्था यथा शक्य ते अन्न वाटप करीत आहेत.
रविवारी दुपारी दोननंतर शहरात संचारबंदी कडक करण्यात आली आहे. त्यामुळे निराधारांचे मोठे हाल होत आहेत. मार्केट, किराणा दुकान बंद असल्याने सकाळपासून रस्त्यावर कोणी दिसत नव्हते. रस्त्याच्या कडेला बसलेले निराधार येणाºया-जाणाºयांकडे मोठ्या आशेने पाहत होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अन्न वाटप करणारी व्हॅन सिद्धेश्वर मंदिराजवळ आली. तेव्हा दोन्ही रस्त्यांच्या कडेला बसलेले निराधार एक एक करून व्हॅनच्या दिशेने धावू लागले. व्हॅनमधून एक व्यक्ती येणाºया प्रत्येकाला अन्नााचे पाकीट देत होते.
हा प्रकार इतरांच्या लक्षात येताच महिला, वृद्ध व अपंग व्हॅनकडे येत होते. पळत असलेले निराधार अन्नाचे पाकीट हातात पडल्यानंतर मोठ्या समाधानाने हळूहळू चालत निघून जात होते. एकवेळच्या अन्नाचा प्रश्न मिटला, असे म्हणत सुटकेचा नि:श्वास टाकत होते.
भूक काय असते याची जाणीव आहे : हिंगमिरे
- माणसाला जगायचं असेल तर त्याला जेवणाची आवश्यकता असते. आज शहरात परिस्थितीमुळे रस्त्यावर दुर्दैवी जीवन जगणाºयांची संख्याही मोठी आहे. सर्वसामान्य माणूस घरात चटणी-भाकर खाऊन बसू शकतो, मात्र निराधार मंडळींना तेही शक्य होत नाही. घर नाही, दार नाही, रस्त्याच्या कडेला आसरा पाहून ही मंडळी भुकेल्या नजरेने आमची वाट पाहत असतात. भूक म्हणजे काय असते याची जाणीव मला असल्याने मी दररोज यथा शक्य अन्नदान करतो. जनावरांना चाराही देतो, अशी माहिती व्यावसायिक वीरेंद्र हिंगमिरे यांनी दिली.
साहेब, ही माणसं येतात म्हणून आम्ही जगतोय
- साहेब, सध्या कोरोना का काय तो रोग आलाय.., सोलापूर बंद झालंय. रोज मागून खातो मात्र सध्या मागायची सोय राहिली नाही. पोट भागवायचं कसं असा प्रश्न आम्हाला रोज पडतो. मात्र साहेब, अन्नदान करणारी ही माणसं जेव्हा येतात तेव्हा आम्हाला देव आल्यासारखा वाटतो. ही माणसं आहेत म्हणून आम्ही जगतोय, अशी भावनिक प्रतिक्रिया सिद्धेश्वर मंदिर येथील एका निराधाराने दिली.
- डीआरएम आॅफिस, रेल्वे स्टेशन, भैय्या चौक मार्गावरील फुटपाथ, डॉ. आंबेडकर चौक, सिद्धेश्वर मंदिर, कुष्ठरोग (लेप्रसी) वसाहत या भागात अनेक निराधार दररोज जेवणाची वाट पाहत असतात.
निराधारांचं पोट भरलं की समाधान वाटतं : तमशेट्टी
सध्या संचारबंदीमुळे निराधारांचे हाल होत आहेत. सोलापूर बंद असल्यामुळे निराधारांना मागूनही खाता येत नाही. पैसे नसल्यामुळे त्यांना काही घेता येत नाही. मोठ्या आशेने ही मंडळी आमची वाट पाहत असतात. निराधारांचं पोट भरलं की आम्हाला समाधान मिळतं, असे मत जय हिंद फूड बँकेचे सतीश तमशेट्टी यांनी व्यक्त केले.