तीन दिवस तिघांनी काढली अल्पवयीन मुलीची छेड
By शीतलकुमार कांबळे | Published: October 4, 2023 07:04 PM2023-10-04T19:04:08+5:302023-10-04T19:04:39+5:30
तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोलापूर : अल्पवयीन मुलीची छेडछाड करून मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याची घटना २० सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी तीन युवकांच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत वैराग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, अल्पवयीन पीडिता आपल्या गावाकडे सणानिमित्त आली होती. २० सप्टेंबर रोजी पीडित मुलीची आई शेतात गेल्यानंतर घरात पीडिता एकटीच असल्याचे पाहून फार्म देण्याचा बहाणा करीत एका युवकाने तोंड दाबून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी त्याने दिली. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी गावातील दुसऱ्या युवकाने घरात कोणी नसल्याचे पाहत मोबाइल नंबर देऊन फोन करण्यास सांगितले. तसे न केल्यास उचलून घेऊन जाण्याची धमकी दिली.
२५ सप्टेंबर रोजी गावातीलच तिसऱ्या युवकाने कपडे वाळत घालत असताना पीडितेचा हात धरून तू माझ्यासोबतच एंगेज राहा म्हणून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून निघून गेला. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या पीडितीने आपल्या नातेवाइकांसोबत पोलिस ठाणे गाठून तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.