राज्यातील पॅकबंद दुधाच्या विक्रीत परराज्यातील डेअरींचा निम्मा वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 01:11 PM2020-09-09T13:11:06+5:302020-09-09T13:15:50+5:30
दर विसंगतीचा घेतात फायदा; अमुल, मदर, नंदिनी विकतात ३३ लाख लिटर दूध
सोलापूर: महाराष्ट्रातील शेतकºयांंकडून प्रति लिटर १८ रुपयांनी खरेदी होणारे दूध ४८ रुपये लिटर दराने ग्राहकांना विकत घ्यावे लागत आहे. राज्यातील दूध संघांतर्गत असलेल्या विसंगतीचा फायदा इतर राज्यातील संघांना झाला असून, अन्य राज्यांतील ३३ लाख लिटर दुधाची विक्री किरकोळ स्वरूपात पिशव्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात होत आहे. परराज्यातील अमुल, मदर आणि नंदिनी पॅकबंद दुधाच्या बाजारपेठेतील ५० टक्के वाटा घेत आहेत.
सध्या राज्यात शेतकºयांकडून खरेदी होणाºया दुधाच्या दराचा विषय ऐरणीवर आहे. महाराष्ट्रात सातत्याने दूध खरेदी दर बदलत असताना ग्राहकांना मात्र लिटरमागे ४६ ते ४८ रुपयेच मोजावे लागत आहेत. राज्य शासनाच्या ‘महानंद’ने चार महिन्यांच्या काळात सहकारी दूध संघाच्या दुधाला २५ रुपये लिटरला दर दिला. खासगी दूध संघांनी मात्र लिटरला २० रुपयेच दर दिला. याशिवाय खासगी संघांमध्ये दरामध्ये स्पर्धा असेल त्या जिल्ह्यात दूध संघ खरेदीचा एक दर तर स्पर्धा नसलेल्या जिल्ह्यात वेगळा दर देतो. खरेदी दर कमी असला तरी ग्राहकांना लिटरला ४६ ते ४८ रुपयेच मोजावे लागत आहेत.
दराच्या स्पर्धेचा परिणाम दुधाच्या गुणवत्तेवर होत असून,यामुळेच इतर राज्यातील दुधाचा महाराष्ट्रातील दूध बाजारावर प्रभाव वाढला आहे. राज्यात पॅकबंद पिशवीतून दररोज ६० ते ६५ लाख लिटर दुधाची विक्री होते. यापैकी कर्नाटक, पंजाब व गुजरातच्या दुधाची ३३ लाख लिटर विक्री होत असल्याचे सांगण्यात आले. गुजरातच्या ‘अमुल’ची २३ लाख, पंजाबचे मदर दूध साडेचार ते पाच लाख लिटर तर कर्नाटकच्या ‘नंदिनी’चे पाच लाख लिटर दूध महाराष्ट्रात विक्री होत आहे.
--------------
दरातील तफावत कमी व्हावी!
आमच्यात ताळमेळ नसल्याने इतर राज्यांतील दूध खरेदीकडे ग्राहक वळले आहेत. शेतकºयांकडून १८ रुपयांनी खरेदी केलेले दूध आमच्याकडून ३४ रुपयांनी लिटरला मिळते; पण ग्राहकांना ४८ रुपयांनी दिले जाते. ही तफावत दूर झाली पाहिजे, अशी अपेक्षा राज्य दूध उत्पादक कल्याणकारी संघाचे प्रकाश कुथवड यांनी व्यक्त केली.
- प्रकाश कुथवड
राज्य दूध उत्पादक कल्याणकारी संघ, पुणे.
---------------
अठरा रुपयांनी खरेदी होणारे दूध ग्राहकांना जवळपास ५० रुपयांनी घ्यावे लागते. याउलट इतर राज्यातील डेअºया अधिक दराने खरेदी करून ग्राहकांना कमी दराने विक्री करतात. राज्यातील खासगी दूध संघ शेतकºयांना दर कमी देत आहेत. यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे.
- अॅड. अजित नवले, शेतकरी संघटना, अहमदनगर