परप्रांतीय विक्रेत्यांनी दिला हात; शेळगी, हिप्परगा परिसरातील कष्टकऱ्यांना मिळाली साथ
By Appasaheb.patil | Published: October 23, 2022 03:09 PM2022-10-23T15:09:28+5:302022-10-23T15:09:39+5:30
कृत्रिम फुलांपासून तोरण, हार; हिप्परगा, शेळगी परिसरातील महिलांना मिळाले काम
सोलापूर: झेंडू, मोगरा, शेवंती या फुलांच्या हुबेहूब दिसणाऱ्या कृत्रिम फुलांचे हार, तोरण, माळ आदी वस्तूंची विक्री करून आपली उपजीविका भागविण्यासाठी चार महिन्यांपूर्वी कर्नाटकातून शहरात काही विक्रेते दाखल झाले आहेत. वाढत्या मागणीनुसार उत्पादन वाढविण्यासाठी स्थानिक लोकांना रोजगार देत या मातीशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
कर्नाटकातील शिमोगा येथील फुलांच्या साहित्याची विक्री करणारे पंधरा कुटुंब शहरात आले. हिप्परगा गावानजीक त्यांनी झोपड्या टाकून तात्पुरती वस्ती केली. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने तयार केलेल्या वस्तूंना सोलापूरकरांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने मागणीत वाढ झाली. उत्पादन वाढण्यासाठी या विक्रेत्यांनी हिप्परगा, शेळगी परिसरातील स्थानिक महिलांना प्रशिक्षण दिले. तोरण, माळा, हार या वस्तू उत्तमरीत्या बनवू शकतात याची खात्री होताच या कष्टकरी महिलांकडून विविध वस्तू तयार करून घेण्यास सुरुवात केली. घरकाम आटोपून फावल्या वेळेत सहज दोन चारशे रुपये कमविता येतात हे पटल्याने अनेक कष्टकरी महिलांची या परप्रांतीय विक्रेत्यांकडे फुले विणण्याच्या कामासाठी मागणी वाढली. सत्तर ते ऐंशी महिलांना दररोज दोनशे ते सहाशे रुपयांचा रोजगार मिळाला. काही विक्रते येथून तयार केलेला माल घेऊन विक्रीसाठी मराठवाडा आणि विदर्भात गेले आहेत.
----------
वस्तू बनविण्याचे कौशल्याचे काम...
शहरात सर्वत्र परप्रातीयांचे हुबेहूब मोगरा, झेंडू, शेवंती यासारख्या दिसणाऱ्या कृत्रिम फुलांच्या वस्तूंचे स्टॉल दिसून येत आहेत. यातील बहुतेक वस्तू बनविण्यामध्ये स्थानिक कष्टकऱ्यांचे हात लागले आहेत. हैदराबाद आणि बंगळुरू येथून कच्चा माल आणून विविध वस्तू बनविण्याचे कौशल्याचे काम शहरात होत आहे.
------------
मी आणि माझी पत्नी दोघांनी मिळून हिप्परगा परिसरातील महिलांना प्रशिक्षण दिले. येथील कष्टकरी महिला कलात्मक निर्मिती करतात याची खात्री झाल्याने येथून मोठ्या प्रमाणात माल तयार करून पुढच्या प्रवासाला जाणार आहोत.
-शंकर नाथ, परप्रांतीय विक्रेते शिमोगा, कर्नाटक.
---------
हिप्परगा गावाजवळ वस्ती केलेल्या या विक्रेत्यांनी परिसरातील महिलांना प्रशिक्षण देत, घरकाम करून फावल्या वेळेत कलात्मक काम करण्याची क्षमता त्यांच्यात असल्याची जाणीव करून दिली. याचा अभिमान वाटतो.
-अशपाक बशीर शेख, नागरिक, हिप्परगा