रोख रकमेसह पावणेसात लाखांचा ऐवज घेऊन परप्रांतीय कामगार झाला पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:23 AM2021-08-29T04:23:43+5:302021-08-29T04:23:43+5:30
ही घटना १३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते १४ ऑगस्ट रोजी रात्री ८ च्या दरम्यान वासुद रोड (सांगोला) येथील ...
ही घटना १३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते १४ ऑगस्ट रोजी रात्री ८ च्या दरम्यान वासुद रोड (सांगोला) येथील नितीन गवळी यांच्या बंगल्यात घडली. याबाबत २८ ऑगस्ट रोजी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.
सांगोला येथील नितीन शशिकांत गवळी यांच्या नवीन बंगल्याला कलर देण्याचे काम परप्रांतीय मजूर शिवनाथ भवरनाथ यास दिले होते. मात्र तो गावाकडे गेल्याने एक महिन्यापासून त्याचा भाऊ गणपत नाथ हा कलर देण्याचे काम करीत होता. दरम्यान, नितीन गवळी याने ५ लाख १० हजार रुपये व पत्नीचे १० तोळे सोन्याचे दोन गंठण कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवून चावी दुसऱ्या कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती. गणपत नाथ १५ ऑगस्टपूर्वी पाच दिवस सदर बेडरूमला कलरचे काम करीत होता. दरम्यान, दोन दिवसाची सुट्टी घेऊन तो इतर कामावर गेला. त्यानंतर नितीन गवळी यांच्याकडे कामावर परतलाच नाही. त्याचा फोनही स्विचऑफ लागला.
१८ ऑगस्ट रोजी शिवनाथ याने नितीन गवळी यांच्या मोबाइलवर फोन करून भाऊ गणपत नाथचा फोन लागत नाही, तुमच्याकडे कामास आहे का? असे विचारले असता त्यांनी तो १५ ऑगस्टनंतर माझ्याकडे कामाला आला नाही, असे सांगितले.
याबाबत नितीन गवळी यांनी पेंटर मनीष याच्याकडे चौकशी केली असता गणपतनाथ याने काही दिवसांपूर्वी गावाकडे मोठ्या प्रमाणात रक्कम पाठविल्याचे सांगितल्याने सदरचा प्रकार उघडकीस आला. याबाबत नितीन गवळी यांनी गणपतनाथ भवरनाथ (रा. मंडी, ता. जयाल, जि. नागोर-राजस्थान) त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.