बेकरीत काम करणारे परप्रांतीय मजूर आता शेती कामात गुुंतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 03:39 PM2020-05-11T15:39:46+5:302020-05-11T15:42:35+5:30
परप्रांतीय मजुरांची विनवणी; हमको हमारे गाव जाना है, भेजने का इंतजाम करो !
करमाळा : लॉकडाऊन झाल्यापासून आजपर्यंत आम्ही कसेबसे दिवस काढले पण आता खूपच हाल होत आहेत़ आता थांबणे मुश्कील होत आहे असे म्हणत ‘हमको हमारे गाव जाना है, गाव भोजने का इंतजाम करो’, अशी विनवणी रेल्वे लाईन, रस्ते, बेकरी या कामांसाठी आलेले परप्रांतीय मजूर संबंधित ग्रामपंचायतीकडे करू लागले आहेत़ बेकरीत काम करणारे मजूर मात्र शेतात कामाला जाऊ लागले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाले आहे. तेव्हापासून आजपर्यंत या मजुरांची कामे बंद आहेत. त्यामुळे करमाळा तालुक्यातील केत्तूर, जिंती, पारेवाडी, वाशिंबे या गावांत आलेले शेकडो परप्रांतीय मजूर लॉकडाऊनमध्ये येथेच अडकले आहेत़ आता त्यांना आपल्या घरी जाण्याची ओढ लागली आहे. इतके दिवस कसेबसे काढले मात्र आता आमची उपासमार होत आहे. त्यामुळे ते संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाकडे विनवणी करू लागले आहेत.
तालुक्यातील अनेक मजूर उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल व राजस्थान येथील आहेत़ आपापल्या गावी जाण्यासाठी या मजुरांची धडपड सुरु असून, रोज ग्रामपंचायत कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्र, सरकारी दवाखाना या ठिकाणी त्यांचे हेलपाटे सुरु आहेत.
गेल्या १५ दिवसांपासून हे सर्व मजूर आपापल्या गावी जाण्यासाठी धडपडत आहेत. यातील अनेक मजूर हे मध्य रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम सुरु असून, त्यासाठी आले होते. बाकीचे बेकरी व्यवसाय, राजस्थान येथील फरशी बसविणारे मजूर तसेच जेऊर ते पारेवाडी - बाभुळगाव या चाललेल्या राज्यमार्गाच्या रस्त्याच्या कामासाठी येथे आले होते.
या महामारीच्या काळात आपल्या कुटुंबापासून दूर असल्याने अनेक मजूर भेदरलेल्या अवस्थेतही आहेत. तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ‘हमको गाव भेजने का इंतजाम करो, हमको हमारे गाव जाना है’ अशी विनवणी ते ग्रामविकास अधिकारी व तलाठी यांना करीत आहेत. स्थानिक प्रशासन पाठपुरावा करीत आहे. पण वरिष्ठ स्तरावरून कोणतीही हालचाल होत नसल्याचे दिसून येत आहे.
सध्या काही ठिकाणांवरून रेल्वेगाड्या जात आहेत. त्यामुळे आम्हालाही प्रशासनाने रेल्वेची सोय करून गावाकडे जाण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा ते व्यक्त करू लागले आहेत़ सध्या लॉकडाऊनमुळे त्यांना गावात फिरण्यासही मर्यादा आहेत. ऊन असल्याने राहत असलेल्या खोल्यांमध्ये त्यांना फिजिकल डिस्टन्सही पाळता येत नाही.
बेकरी व्यवसायातील मजूर शेतीच्या कामावर
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर काही दिवस स्वत:जवळील पैसे खर्च करून पोट भरले़ पण आता पैसे संपलेले आहेत़ खाण्यासाठी काहीही मिळत नसल्याने काही बेकरी व्यवसायातील मजूर सध्या उपासमार होण्यापेक्षा शेतीच्या कामावर जात असल्याचे दिसून येत आहे़
घाबरलेल्या स्थितीत मजूर
च्जर आम्हाला कोरोना झाला तर येथे पाहण्यासाठी आमचे कोणी नाही. त्यामुळे ते सर्व मजूर भेदरलेले आहेत. सोलापूर किंवा कुर्डूवाडी येथून रेल्वे जाणार आहे. अशी त्यांच्यामध्ये चर्चा सुरु असल्याने त्यातील काही मजूर कुर्डूवाडीला जाण्याच्या तयारीत आहेत़ घरी जाण्यासाठी या मजुरांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहे पण त्यांना अधिकृत अशी कोणतीच माहिती मिळत नसल्याने ते सध्या संभ्रमात आहेत. आपल्या गावाकडे केव्हा जाऊ याचा त्यांना अजूनही थांगपत्ता नाही.