हिंस्त्र प्राण्याच्या शोधासाठी तीन जिल्ह्यातील वनविभागाचे पथक करमाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:47 AM2020-12-05T04:47:36+5:302020-12-05T04:47:36+5:30
करमाळा (जि. सोलापूर): पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्याचा हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यामुळे वनविभाग खडबडून जागा झाला आहे. सोलापूर,अहमदनगर व ...
करमाळा (जि. सोलापूर): पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्याचा हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यामुळे वनविभाग खडबडून जागा झाला आहे. सोलापूर,अहमदनगर व पुणे या तीन जिल्ह्यातील वनविभागाचे पथक करमाळ्यात दाखल झाले आहे. गुरुवारच्या घटनेनंतर हिंस्त्र प्राण्याला पकडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
मोरवड, मांगी, हिवरवाडी, भोसे परिसरात हिंस्त्र प्राण्याचा वावर असल्याचे नागरिकांनी सांगितले. गेल्या आठवडाभरापासून करमाळा तालुक्यात हिंस्त्र प्राणी हा बिबट्या असल्याची चर्चा आहे. गुरुवारी सायंकाळी कल्याण दुधे या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतरच प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे.
घटना घडल्यानंतर गुरुवारी रात्रीच मोहोळ, सोलापूर, अहमदनगर व पुणे विभागातील वनविभागाचे कर्मचारी करमाळा तालुक्यात दाखल झाले आहेत. तालुक्यात ज्या ठिकाणी हिंस्त्र प्राण्याचा वावर आहे त्या ठिकाणच्या भागात या प्राण्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. तब्बल पाच ते सहा ठिकाणी सापळा रचण्यात येणार आहे. त्यामध्ये जिंती, मोरवड, रोशेवाडी, लिंबेवाडी या भागांचा समावेश आहे.
फुंदेवाडी (रावगाव) येथे हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्या घटनास्थळी भेट देऊन आमदार संजयमामा शिंदे यांनी पाहणी केली.