नियम धाब्यावर बसवून वन कर्मचाऱ्यांनीच केली झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:27 AM2021-08-20T04:27:00+5:302021-08-20T04:27:00+5:30
महाराष्ट्र शासन पर्यावरणाचा समतोल राखून शुद्ध ऑक्सिजन मिळावा यासाठी ‘झाडे लावा, देश जगवा’, या संदेशाद्वारे सर्वत्र वृक्ष लागवड करीत ...
महाराष्ट्र शासन पर्यावरणाचा समतोल राखून शुद्ध ऑक्सिजन मिळावा यासाठी ‘झाडे लावा, देश जगवा’, या संदेशाद्वारे सर्वत्र वृक्ष लागवड करीत आहे. मात्र सांगोला वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच वृक्ष तोडीचे नियम धाब्यावर बसवून वरिष्ठांकडून कोणतीही परवानगी न घेता शिरभावी येथील गट नंबर ७१ मध्ये वनीकरण केलेल्या १० ते १५ वर्षांपूर्वीची सर्व झाडे जेसीबीच्या साह्याने काढून टाकली आहेत. याबाबत युवासेना तालुका समन्वयक शंकर मेटकरी, तालुकाप्रमुख सुभाष भोसले व हलदहिवडी शिवसेना शाखाप्रमुख समाधान चव्हाण यांनी लेखी तक्रार देऊनही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
हा प्रकार एवढ्यावरच न थांबता लिंबासह इतर झाडे काढल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर कोणालाही न कळवता याचा परस्पर पंचनामा केला.
सदरची झाडे तोडून वनपरिक्षेत्र अधिकारी व वनरक्षकांनी विक्री केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांनी पदभार स्वीकारल्यापासून असे प्रकार वारंवार घडत आहेत. बेकायदा वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस आणला म्हणून युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर गावगुंडांकडून अर्ज मागे घेण्यास दबाव टाकला जात आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
दोन महिन्यानंतरही कारवाई नाही
वृक्षतोड करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, यासाठी यापूर्वी सोलापूर उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्याकडे २२ जून रोजी निवेदन दिले होते. मात्र दोन महिन्यानंतरही संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. बेकायदा वृक्षतोड करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नसल्याचे शंकर मेटकरी, सुभाष भोसले व समाधान चव्हाण यांनी सांगितले.