स्वत:च्या लक्षवेधीचा महसूलमंत्र्यांना विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 05:17 AM2018-04-30T05:17:20+5:302018-04-30T05:17:20+5:30
राज्यात २०१२-१३ या महसुली वर्षात गाजलेल्या चारा घोटाळ्यातील कारवाईचा गुंता अद्यापही सुटलेला नाही. छावणी चालकांवर १२ कोटींची दंडात्मक कारवाई झाली असली तरी गैरप्रकारात गुंतलेले अनेक अधिकारी अद्यापही मोकळेच आहेत
सोलापूर : राज्यात २०१२-१३ या महसुली वर्षात गाजलेल्या चारा घोटाळ्यातील कारवाईचा गुंता अद्यापही सुटलेला नाही. छावणी चालकांवर १२ कोटींची दंडात्मक कारवाई झाली असली तरी गैरप्रकारात गुंतलेले अनेक अधिकारी अद्यापही मोकळेच आहेत. तेव्हा विरोधी बाकावर असताना लक्षवेधी मांडून सरकारला जाब विचारणारे चंद्रकांत पाटील आज महसूलमंत्री आहेत. मात्र त्यांनाही आपल्या लक्षवेधीचा विसर पडला आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कदम यांनी केला आहे.
किसान आर्मी वॉटर आर्मी संघटनेचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला आहे. प्रशासकीय चौकशीचा आधार घेऊन तत्कालीन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदींविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. १४ नोव्हेंबर २०१७ रोजी सरकारच्या आदेशानंतर सांगोला पोलिसांनी छावणी चालकांविरूद्ध कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले होते, असे कदम यांनी सांगितले.