श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्याला आमराईचे रुप....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:20 AM2021-05-15T04:20:20+5:302021-05-15T04:20:20+5:30
हिंदू सण व उत्सवानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात विविध फुलांची व फळांची आरास करण्यात येत आहे. अक्षय ...
हिंदू सण व उत्सवानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात विविध फुलांची व फळांची आरास करण्यात येत आहे. अक्षय तृतीयेनिमित्त मंदिरात आंब्यांची आरास करण्याची इच्छा पुणे येथील विनायक काची (बुंदेले) यांनी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे व्यक्त केली. त्यानुसार त्यांना अधिकाऱ्यांनी सेवा करण्याची संधी दिली.
आरास करण्यासाठी हापूस आंबे, आंब्याच्या झाडांची पाने, डाळिंब , कलिंगड, सफरचंद, अननस, मोसंबी या फळांचा वापर करण्यात आला आहे. ही आरास श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात श्री विठ्ठल चौखांबीस करण्यात आली आहे. यामुळे विठ्ठलाच्या गाभाऱ्यास आमराईचे स्वरुप प्राप्त झाले. कोरोनामुळे श्री विठ्ठलाचे दर्शन व आकर्षक रुप भाविकांना प्रत्यक्ष जाऊन पाहता येत नसले, तरी मंदिर समितीच्या www.vitthalrukminimandir.org या वेबसाईटवर दर्शन घेता येईल, असे मंदिर समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.