बेरोजगारीला कंटाळून सोलापूर महापालिका परिवहन विभागातील माजी कर्मचाºयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:55 PM2018-11-29T12:55:32+5:302018-11-29T12:58:25+5:30
सोलापूर : सोलापूर परिवहन विभागातील माजी कर्मचारी अय्युब हसन खान (वय-५४, रा. विजापूर नाका झोपटपट्टी, सोलापूर) याने बेरोजगारीला कंटाळून ...
सोलापूर : सोलापूर परिवहन विभागातील माजी कर्मचारी अय्युब हसन खान (वय-५४, रा. विजापूर नाका झोपटपट्टी, सोलापूर) याने बेरोजगारीला कंटाळून बुधवारी पहाटे गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला.
अय्युब हसन खान हे गेल्या २0 वर्षांपासून सोलापूर परिवहन विभागात कामाला होते. गेल्यावर्षी तब्बल आठ महिने त्यांचा पगार झाला नव्हता, त्यामुळे उपजीविका करायची कशी हा मोठा प्रश्न अय्युब खान यांच्या समोर होता. अय्युब खान यांना पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
एसएमटीमध्ये पगार होत नसल्याने सुट्टी टाकून अय्युब खान यांनी नोव्हेंबर २0१७ मध्ये कुटुंबीयांसमवेत पुणे गाठले. पुण्यात एका गॅरेजमध्ये काम करीत होते. कामाचा पगार, राहण्याचे भाडे आणि दैनंदिन खर्च याचा मेळ बसत नव्हता. तरीही आज नाही तर उद्या काहीतरी फरक पडेल या अपेक्षेने ते पुण्यात काम करत होते. परिवहन विभागाची आशा मावळल्याने त्यांनी चार महिन्यांपूर्वी सोलापुरात येऊन नोकरीचा राजीनामा दिला होता.
राजीनामा देऊन पुन्हा ते पुण्याला गेले होते; मात्र त्या ठिकाणी चरितार्थ चालवणे अवघड झाल्याने अय्युब खान यांनी अखेर जगाचा निरोप घेतला.
शेवटची मागणी...
- अय्युब खान यांना एक मुलगा व एक मुलगी असून मुलगा सलमान हा खासगी टेम्पोवर चालक म्हणून काम करतो. मुलीने फॅशन डिझाईनचा कोर्स केला आहे. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी आपल्या सर्व पाहुण्यांमध्ये मुलगा पाहण्यास सांगितले होते. लवकर मुलीचे लग्न उरकावे असा विचार अय्युब खान करीत होते. मुलगा सलमान हा टेम्पो घेऊन हुबळी येथे जात होता, रात्री सर्वांसोबत जेवण केले. मुलास रस्त्याने व्यवस्थित जा, येताना मला चांगली चप्पल घेऊन ये असे सांगितले होते. पण मुलगा हुबळीत असताना सकाळी ६ वाजता बहिणीचा फोन गेला व घरी येण्यास सांगितले.