माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनामुळे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 08:18 AM2020-08-18T08:18:04+5:302020-08-18T08:19:46+5:30
आपल्या सर्वांचे आधार, ज्येष्ठ नेते, माजी आमदार आदरणीय श्री सुधाकर पंत परिचारक यांचे काल रात्री साडे अकराच्या (11.35 PM)सुमारास पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे दुःखद निधन झाले.
सोलापूर/ मुंबई - सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक याचे पुण्यात निधन झाले आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी रात्री 11.35 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते 85 वर्षांचे होते. सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.
सुधाकरपंत परिचारक यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर पंढरपुरात उपचार करण्यात आले होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती. मात्र काल संध्याकाळी अचानक त्यांना मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. त्यातच त्यांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. अखेर काल रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी १०.३० वाजता त्यांच्यावर पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सुधाकरपंत हे भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते आहेत.
सुधाकरपंत परिचारक यांचा परिचय
सुधाकरपंत परिचारक यांनी 2019 मध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
सुधाकरपंत परिचारक हे दहा वर्ष राष्ट्रवादीचे आमदार होते. 2009 मध्ये सुधाकरपंत परिचारक यांना पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी जाहीरही झाली होती. मात्र ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी पंतांनी उमेदवारी मागे घेतली. परंतु मोहिते पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला.
सुधाकरपंत परिचारक यांना एकेकाळी पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे. त्यांनी पाच वेळा पंढरपूरमधून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कामही पाहिले होते.
गेल्या दहा वर्षांच्या काळात सुधाकरपंत निवडणुकांपासून लांब राहिले. पंचाहत्तरी गाठल्यानंतर इतरांना संधी देण्यासाठी सुधाकरपंतांनी ‘बॅक टू पॅव्हेलियन’ करणं पसंत केलं होतं. 2014 च्या निवडणुकीपासून परिचारकांनी राष्ट्रवादीसोबतही काडीमोड घेतला. मात्र कार्यकर्त्यांचा जोश पाहून गेल्या वर्षी सुधाकरपंतांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. सुधाकरपंत हे भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते आहेत. त्यामुळे भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. भाजपने तिकीट न दिल्यास अपक्ष लढा, असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे होते, मात्र भाजपने त्यांना तिकीट दिल्याने सुधाकरपंत रिंगणात उतरले मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते.