सोलापूरातील किल्ला बालोद्यानची दुरवस्था,बाग अन् झाडे पाण्याअभावी जळू लागली
By admin | Published: March 31, 2017 02:54 PM2017-03-31T14:54:11+5:302017-03-31T14:54:11+5:30
आॅनलाइन लोकमत सोलापूर
आॅनलाइन लोकमत सोलापूर
शिवाजी सुरवसे
सोलापूर : बागेचे संवर्धन व्यवस्थित होत नसल्याचे कारण पुढे करून भारतीय पुरातत्त्व खात्याने भुईकोट किल्ल्यातील महापालिकेच्या ताब्यात असलेल्या किल्ला बालोद्यान या बागेचा ताबा घेतला खरा; मात्र आता या बागेची वाईट अवस्था पुरातत्त्व खात्याने करून ठेवली आहे़ पाणी नसल्यामुळे बागेतील अनेक झाडे वाळू लागली आहेत़ त्यामुळे पुरातत्त्व खात्याला १५ रुपये प्रवेश फी देऊन केवळ ओसाड बाग पहावी लागत आहे.
किल्ल्याच्या मालकीचा ११ हेक्टर आणि ३३ आर एवढ्या जागेचा उतारा आहे़ किल्ल्याच्या मध्यवर्ती भागातील बाग मनपाकडे बरीच वर्षे होती़ पूर्वी या ठिकाणी साऊंड सिस्टीम, कारंजे, छानशी झाडी होती; मात्र कालांतराने याकडे दुर्लक्ष झाले़ आता तर पुरातत्त्व खात्याने तर करायचे नाही आणि दुसऱ्यालाही करु द्यायचे नाही अशी भूमिका घेतल्यामुळे अनेक विकासकामे खोळंबली आहेत़
भारतीय पुरातत्त्व खात्याच्या मुंबई विभागाचे अधीक्षक डॉ. व्ही. एस. बाडीगर यांनी आयुक्त विजयकुमार काळम—पाटील यांना बागेचा ताबा देण्याबाबत पत्र पाठविले आहे. भुईकोट किल्ल्यात बाग आहे. दिवसा ही बाग पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात होती तर सायंकाळनंतर महापालिकेकडे बागेचा ताबा होता; मात्र आता या बागेचा पूर्ण ताबा हा पुरातत्त्व विभागाकडे आहे़ दुरुस्ती, देखभालीच्या अटीवर सुरुवातीला २३ जानेवारी १९८३ ते २५ जानेवारी २00८ या २५ वर्षे कालावधीसाठी ही बाग महापालिकेला पुरातत्त्व खात्याने लीजवर दिली होती. २00८ मध्ये करार संपल्यावर पुन्हा पाच वर्षांसाठी म्हणजे २४ जानेवारी २0१३ पर्यंत या करारास मुदतवाढ देण्यात आली. जानेवारी महिन्यापासून या किल्लाबालोद्यानचा पूर्ण ताबा पुरातत्त्व खात्याकडे आहे़
किल्ल्याच्या बाहेरील बाजूस खंदक व हुतात्मा बाग आहे. या बागेची मालकी महापालिकेची आहे. स्मार्ट सिटी योजनेत या बागेचा विकास प्रकल्प सादर करण्यात आला होता. यासाठी दोन कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. स्मार्ट सिटीतील या पहिल्या प्रकल्पाचे भूमिपूजन २५ जून २०१६ रोजी झाले. बाग किल्ला क्षेत्रालगत असल्याने सुशोभीकरणाच्या बांधकामास पुरातत्त्व खात्याची परवानगी आवश्यक आहे. यासाठी महापालिकेने पुरातत्त्व खात्याच्या मुंबईच्या विभागीय कार्यालयाकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नाही़ पुरातत्त्व खात्याच्या मुंबई विभागाचे अधीक्षक बाडीगर यांनी पाहणी केली असून सुशोभीकरणाचे काम पुरातत्त्व खात्यानेच करावे असा प्रस्ताव महापालिकेने ठेवला आहे़ अद्याप कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत़
---------------
अधिकाऱ्यांची उडवाउडवी
च्बागेतील पाण्याची मोटार बंद आहे; मात्र ती खरेदी करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडे पैसे नाहीत़ आता मार्च एण्ड आहे खूप कामे आहेत, आग्रा ब्रँचकडे याबाबींचा पाठपुरावा करावा लागेल़ आम्ही तरी काय करणार असे मत पुरातत्त्व विभागाचे दसरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले़
--------------------
- बागेतील अनेक झाडे वाळू लागली, बालोद्यान ओसाड बनतेय.
- झाडांना पाणी देण्याची आणि देखभाल करण्याची सोय नाही.
- किल्ल्यांच्या डागडुजीकडे आणि सुशोभीकरणाकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष.
- किल्ला परिसरात अनेक बांधकामे मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष.
- किल्ला बनला आता अवैध व्यवसायाचा अड्डा.
-----------------
किल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे़ अनेक ठिकाणी झाडेझुडपी वाढली आहेत़ बगिचासाठी पाणी नाही़ पुरातत्त्वचे अधिकारी दुर्लक्ष करतात़ सावरकर मैदानाकडील गेट उघड्याबाबत वारंवार आदेश येऊनही कारवाई केली जात नाही़ या किल्ल्याचे सुशोभीकरण करुन संवर्धन केले पाहिजे़
- भीमाशंकर दर्गोपाटील