चोरीच्या ट्रॅक्टरची विल्हेवाट लावणाऱ्या चौघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By विलास जळकोटकर | Published: June 2, 2024 08:21 PM2024-06-02T20:21:29+5:302024-06-02T20:21:42+5:30

१० लाखांचा मुद्देमाल जप्त : सीएनएक्स-पुना नाका रोडवर सापळा

four accused arrested for disposed of stolen tractor | चोरीच्या ट्रॅक्टरची विल्हेवाट लावणाऱ्या चौघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

चोरीच्या ट्रॅक्टरची विल्हेवाट लावणाऱ्या चौघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सोलापूर: उत्तर सोलापूर तहसील आवारातून चोरी केलेल्या दोन ट्रॅक्टर व ट्रॉलीची विल्हेवाट लावण्यासाठी थांबलेल्या चौघांना गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून अटक केली. त्यांच्याकडून ९ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संजय मनोहर गावडे (वय- ३२), आनंद उर्फ बिरु नामदेव गाडेकर (वय २१, दोघे चालक, रा. पाथरी, ता. उत्तर सोलापूर), आडप्पा शिवप्पा कोळी (वय- ३०), अभिषेक उर्फ छकुल्या विश्वनाथ गायकवाड (वय २३, चालक दोघे रा. तिऱ्हे ता. उत्तर सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना सदर बझार पोलिसांकडे पुढील प्रक्रियेसाठी सुपूर्द करण्यात आले.

जुलै २०२३ मध्ये महसूल विभागाने अवैध वाळूची वाहतूक करणारे २ ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त करुन उत्तर सोलापूर तहसीलच्या आवारात ठेवलेले होते. नमूद चोरट्यांनी दोन्ही वाहने चोरुन नेले होते. सदर बझार पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदलेला होता.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे फौजदार अल्फाज शेख आणि त्यांचे पथक शोध घेत होते. खबऱ्याकडून मिळालेल्या टीपनुसार सीएनएक्स ते जुना पुनानाका बायपास रोडवरील मैदानात ट्रॅक्टरची विल्हेवाट लावण्यासाठी थांबलेल्या चौघांना सापळा लावून अटक करण्यात आली. त्यांच्याकडील ट्रॅक्टर व दोन ट्रॉल्या असा ९ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, बाप साठे, सैपन सय्यद, भारत पाटील, सुभाष मुंढे, वसीम शेख, धीरज सातपुते, आबासाहेब सावळे, सतीश काटे, सायबरचे अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड यांनी केली.

११ महिन्यानंतर गुन्हा उघडकीस
अटक केलेल्या आरोपींची चौकशी करताना त्यांनी २ जुलै २०२३ रोजी नमूद ट्रॅक्टर व ट्रॉली उत्तर सोलापूर तहसीलच्या आवारातून चोरी केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली कार आणि बुलेटही जप्त केली. तब्बल ११ महिन्यानंतर अखेर हा गुन्हा उघडकीस आला.

Web Title: four accused arrested for disposed of stolen tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.