वृद्धाची फसवणूक करणाऱ्या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:20 AM2021-03-24T04:20:31+5:302021-03-24T04:20:31+5:30
अजनाळे (ता. सांगोला) येथील विठ्ठल राजाराम गुजर हे १३ जानेवारी रोजी दु. २.४१ च्या सुमारास सांगोला येथील स्टेट बँक ...
अजनाळे (ता. सांगोला) येथील विठ्ठल राजाराम गुजर हे १३ जानेवारी रोजी दु. २.४१ च्या सुमारास सांगोला येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आले होते. ते एटीएममधून पैसे काढत असताना त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या अनोळखी इसमाने ते टाईप करीत असलेल्या एटीएम कार्डचा पासवर्ड पाहून मोबाईलमध्ये आलेल्या मेसेजची त्यांना चुकीची माहिती देऊन तुमचे कार्ड ब्लॉक झाले आहे, असे सांगून दिशाभूल केली. दरम्यान त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून पासवर्डचा वापर करून त्यांच्या खात्यामधून सुमारे ७८ हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. याबाबत विठ्ठल गुजर यांनी फिर्याद दाखल केली होती.
त्यानुसार सांगोला पोलीस स्टेशनला गु.र.नं. १०२/२०२१ नुसार भादंवि कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता.
ठाणे परिसरातील सदर चौघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार असून महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक सीमावर्ती भागात गुन्हे करीत होते. या गुन्ह्यात ‘त्या’ चौघांना अटक केली होती. शिरवळ पोलिसांच्या चौकशीदरम्यान या आरोपीने सांगोला पोलीस स्टेशन हद्दीत फसवणुकीचा गुन्हा केल्याचे सांगितले. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सदर आरोपींना शिरवळ पोलीस स्टेशनकडून सांगोला पोलीस स्टेशनला वर्ग करून अटक केली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना अभिजित मोहोळकर, दत्ता वजाळे, पोकॉ बाबासाहेब पाटील, सचिन देशमुख, राहुल देशमुख यांनी केली.