चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बार्शीतील कृषी सहाय्यकाचा खून
By appasaheb.patil | Published: January 18, 2020 01:41 PM2020-01-18T13:41:58+5:302020-01-18T13:44:40+5:30
लऊळ (ता. माढा) येथे झालेल्या खुनातील मृतदेहाची ओळख पटली
सोलापूर : गेल्या मंगळवारपासून बेपत्ता असलेले बार्शी कृषी विभागातील कृषी सहाय्यक अंगद सुरेश घुगे (वय ४३) यांचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.
लऊळ (ता. माढा) येथे झालेल्या खुनातील मृतदेहाची ओळख पटली असून अंगद सुरेश घुगे (वय ४२) असे त्याचे नाव असल्याचे पोलीसांनी सांगितले़ ते बार्शी तालुक्यातील भालगाव येथील रहिवासी आहेत. मृत हे बार्शी येथील कृषी विभागात कृषी सहाय्यक म्हणून पदावर कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, लऊळ ते शिराळ रस्त्यावरील चौशी वस्तीजवळील जोशी यांच्या मळ्याजवळ निर्मनुष्य माळरानावरील रस्त्याच्या बाजूला एका खड्ड्यामध्ये काटेरी झुडपात जळालेली व्यक्ती असल्याची खबर लऊळचे पोलीस पाटील चंद्रकांत लोकरे यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात कळविली होती़ त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे, सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते़ त्यावेळी त्यांना घटनास्थळी अनोळखी व्यक्तीचा जळालेला मृतदेह दिसून आला. त्याच्या डोक्यावर, तोंडावर, गळ्यावर, पोटावर व पायावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या खुणा व डाव्या हाताची तीन बोटे नसल्याचे पोलिसांना प्रथमदर्शनी दिसून आले होते.
मृतदेहावरील कपडे व वीस-पंचवीस हजार रुपयांच्या नोटा अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आल्या होत्या़ बेल्ट, भरलेली काडीपेटी आदी साहित्यही घटनास्थळावर दिसले होते़ त्यानंतर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह उचलून बालाजी कोळेकर यांच्या मदतीने शवविच्छेदनासाठी कुर्डूवाडी ग्रामीण रूग्णालयात आणले आहे. दरम्यान संबंधित मयताबद्दल कोणास माहिती असल्यास कुर्डूवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, पोलीसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून मृतदेह कोणाचा आहे याचा तपास लावला़ या घटनेची माहिती मयत अंगद घुगे यांच्या कुटुंबियांना समजताच कुटुंबियांनी रूग्णालयात मोठी गर्दी केली होती़ याप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचे काम सुरू असून खुन कोणी केला ? कशासाठी केला असावा ? याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत.