गणेश मंडळ अध्यक्ष निवडीवरून हाणामारी बार्शीतील पाचजणांना चार दिवसांची कोठडी
By काशिनाथ वाघमारे | Published: September 1, 2023 08:00 PM2023-09-01T20:00:24+5:302023-09-01T20:00:54+5:30
मंगळवार, २९ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास हनुमान मंदिर, घोडके प्लॉट येथे ही घटना घडली होती.
सोलापूर : बार्शीतील सुभाषनगर भागातील घोडके प्लॉटमधील गणपती मंडळाच्या अध्यक्षपदी निवडीवरुन दोन गटात कोयत्याने हाणामारी झाली. यानंतर परस्परविरोधी दाखल झालेल्या गुन्ह्यात दोन्ही गटातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक करून शुक्रवारी न्या.पठाण यांच्या न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
मंगळवार, २९ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास हनुमान मंदिर, घोडके प्लॉट येथे ही घटना घडली होती. पहिल्या फिर्यादीमध्ये अभिषेक वाघमोडे (२५, रा. घोडके प्लॉट, लातूर रोड) यांनी तक्रार दिल्यानंतर आकाश जाधव, अक्षय जाधव, भानुदास जाधव, पंढरी जाधव (सर्व रा. घोडके प्लॉट, जामगाव रोड, बार्शी) व गौरव शंकर माने (रा.कर्वेनगर, पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. यातील भानुदास जाधव व पंढरी जाधव यांना पोलिसांनी अटक केली.
तर दुसरी तक्रार अक्षय पंढरी जाधव (रा. घोडके प्लॉट, बार्शी) यांनी दिली आहे. या तक्रारीनुसार समाधान वाघमोडे, अभिषेक वाघमोडे, ज्ञानू क्षीरसागर आणि ओंकार खताळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पी. एस. सिरसाट करत आहेत.