सोलापूरला चार दिवसाआड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 03:08 PM2018-04-26T15:08:58+5:302018-04-26T15:08:58+5:30
टाकळी जलवाहिनीवर शुक्रवारी शटडाऊन, दुरूस्तीचे काम सुरू
सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा चार दिवसाआड करण्याचे नियोजन आणखी ४ मेपर्यंत वाढविण्यात आले आहे. टाकळी जलवाहिनीवरील गळती थांबविण्यासाठी शटडाऊन घेण्यात येणार असल्याने हा बदल करण्यात आला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाºया टाकळी सोरेगाव मुख्य जलवाहिनीवर तेरामैलजवळील रिलायन्स पेट्रोल पंप, व्होनमुर्गी फाटा आणि नवीन विजापूर नाका अशा तीन ठिकाणी गळती सुरू आहे. या गळतीतून दररोज सुमारे दीड लाख लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे ही गळती दुरुस्ती करण्यासाठी टाकळी येथील पंप बंद करावे लागणार आहेत. यासाठी २७ एप्रिल रोजी सकाळी ११ नंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जुना विजापूर नाक्याजवळील गळती मोठी आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे ३0 तासांचा कालावधी लागणार आहे. २८ एप्रिल रोजी दुपारी दुरुस्तीनंतर पंप सुरू केल्यावर पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. दुरुस्तीसाठी घेण्यात येणाºया शटडाऊनमुळे दीड दिवस पाणी उपसा न झाल्याने शहर व हद्दवाढ भागातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे २७ एप्रिल ते ४ मे या कालावधीत तीन ऐवजी चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
यापूर्वी औज व चिंचपूर बंधाºयाची पाणीपातळी शून्यावर गेल्याने चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला. उजनीतून सोडलेले पाणी औजला पोहोचण्यास विलंब झाल्याने हा कालावधी वाढला. त्यानंतर गेल्या आठवड्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने तीन दिवसाआड पाणीपुरवठयाचे वेळापत्रक कोलमडले. आता दुरुस्तीमुळे ही अडचण कायम राहिली आहे. एकीकडे सोलापूरचे तापमान ४२ अंशावर गेले आहे. त्यामुळे पाण्याची मागणी दीडपटीने वाढली आहे. अशात दुसरीकडे एकामागून एक अडचणी निर्माण होत आहेत.