एक किलो पेढ्याच्या खव्यासाठी म्हशीचे चार तर गायीचे साडेपाच लिटर लागते दूध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:58 PM2019-07-09T12:58:05+5:302019-07-09T13:00:01+5:30
पंढरपुरी पेढ्याला भाविकांची पसंती; आषाढीसाठी बाहेरूनही येतात पेढे विक्रेते
ज्योतिराम शिंदे
पंढरपूर : पेढा तयार करण्यासाठी लागणाºया एक किलो खव्यासाठी म्हशीचे चार लिटर तर गायीच्या साडेपाच लिटर दुधाचा वापर केला जातो, असे पेहे येथील खवा व्यावसायिक पिंटू पाटील यांनी सांगितले.
पंढरपुरातील काही व्यापारी येथीलच खवा बाजारासह सोलापूर, येरमाळा येथून खव्याची खरेदी करतात. हा पेढा तयार करण्यासाठी लागणारा खवा वातानुकूलित वातावरणात ठेवला तर साधारणत: दोन ते तीन आठवडे चांगल्या स्थितीमध्ये राहू शकतो़ या खव्यापासून बनविलेला पेढा साधारण एक ते दीड महिना खाण्यायोग्य राहतो, असे स्थानिक व्यापाºयांनी सांगितले.
आषाढी वारीच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपºयातून लाखो भाविक पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. यावेळी प्रत्येक वारकरी विठ्ठलाचा प्रसाद म्हणून पंढरपुरातील पेढ्याची खरेदी नक्कीच करतो. हा पेढा तयार करण्यासाठी लागणारा खवा वातानुकूलित वातावरणात ठेवला तर दोन ते तीन आठवडे चांगल्या स्थितीमध्ये राहू शकतो़ या खव्यापासून बनविलेला पेढाही एक ते दीड महिना खाण्यायोग्य असतो.
पंढरीत लाड, कुलकर्णी, देशपांडे या मोठ्या व्यापाºयांसह अनेक लहान-मोठे व्यावसायिक पेढा विक्री करतात. पंढरीत शनिवार आणि मंगळवार असे दोन दिवस खव्याचा बाजार भरतो. या बाजारामध्ये खेडभाळवणी, मेंढापूर, खेडभोसे, व्होळे, गुरसाळे, पेहे, बार्डी येथील शेतकरी म्हशीच्या दुधापासून घरीच खवा तयार करून बाजारात विक्रीसाठी आणतात. तसेच काही खवा विक्रेते स्थानिक शेतकºयांकडून दुधाची खरेदी करून मशीनद्वारेही खवा तयार करतात. आषाढी वारीपूर्वी दोन दिवस कर्नाटक, उस्मानाबाद, कुंथलगिरी, बीडसह मराठवाड्यातूनही काही व्यावसायिक पेढा विक्रीसाठी आणतात.
आषाढी वारीच्या कालावधीमध्ये प्रत्येक पेढे विक्रेते साधारणत: १०० ते १२५ किलोपर्यंत पेढ्याची विक्री करतात. यातून सात-आठ दिवसांच्या वारीकाळात सुमारे ४५ ते ५० टन पेढ्याची विक्री केली जाते.
खव्यातील साखरेच्या प्रमाणानुसार दर्जा
- खव्यामध्ये किती साखर वापरायची याचे प्रमाण ठरलेले असते़ त्यानुसारच पेढ्याचा दर्जा ठरतो़ उत्कृष्ट दर्जाचा पेढा तयार करण्यासाठी ७५ टक्के खवा आणि २५ टक्के साखरेचा वापर केला जातो. मध्यम दर्जाचा पेढा तयार करण्यासाठी ५० टक्के खवा आणि ५० टक्के साखरेचा वापर करतात. याबरोबरच २५ टक्के खवा आणि ७५ टक्के साखरेचा वापर करूनही काही व्यापारी पेढा तयार करतात.