पंढरपुरात चार किलो गांजा जप्त; एकास अटक करून पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:23 AM2021-05-26T04:23:38+5:302021-05-26T04:23:38+5:30
कोल्हापूर पथकाने केली एकाला अटक पंढरपूर : पंढरपुरातील संतपेठ परिसरातील एका घराची झडती घेऊन ४० हजार रुपये किमतीचा ४ ...
कोल्हापूर पथकाने केली एकाला अटक
पंढरपूर : पंढरपुरातील संतपेठ परिसरातील एका घराची झडती घेऊन ४० हजार रुपये किमतीचा ४ किलो गांजा जप्त केला. कोल्हापूरच्या राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी दिलीप चंदेले यास अटक केली आहे.
शिरोळ तालुक्यातील आगद येथील तरुण शकील गवंडी यास गांजा बाळगल्याप्रकरणी उत्पादन शुल्कच्या पथकाने पकडून ९ हजार रुपयांचा गांजा जप्त केला. गवंडी याने हा गांजा कोठून आणला, कोठे, कोठे विक्री केली याचा तपास करावयाचा असल्याने त्याला न्यायालयात उभा करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पोलीस कोठडीत आरोपी गवंडी याची कोल्हापूर पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा त्याने हा गांजा आपण पंढरपूर येथील संतपेठ परिसरातील एका घरातून आणल्याची माहिती दिली.
यानंतर उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उपासे, उपायुक्त वाय.एस. पवार,जे.जी. जाधव, निरीक्षक पी. आर. पाटील, सहायक निरीक्षक राहुल गुरव, वर्षा पाटील, विजय माने या पथकाने पंढरपुरात येऊन त्या घराची झडती घेतली. तेव्हा घरात ४० हजार रुपये किमतीचा ४ किलो गांजा मिळून आला. या प्रकरणी पोलिसांनी दिलीप चंदेले यास अटक केली. पुढील तपास करण्यासाठी चंदेले यास कोल्हापूरला नेले आहे.
----