सेंद्रिय खताद्वारे ३० गुंठ्यांत घेतले चार लाखांचे टरबूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 10:45 AM2020-02-10T10:45:40+5:302020-02-10T10:47:46+5:30
शेतकरी बबलू देवकतेंची यशोगाथा; होणार होते पोलीस... झाले प्रगतशील बागायतदार
नितीन उघडे
कामती : पोलीस भरतीची तयारी केली़़़तिथली स्पर्धा अन् गर्दी पाहून घरी परतले...भविष्याचा प्रश्न भेडसावत होता...अशावेळी त्यांना पारंपरिक शेतीमध्ये टरबुजाचे पीक घेण्याचा विचार आला... विचार अंमलात आणला अन् सेंद्रिय खताचा वापर करुन, ड्रीपने पाणी देऊन ३० गुंठ्यांत चार लाखांचे टरबुजाचे फळपीक घेतले.
ग्रामीण भागात नोकरीऐवजी जास्तीत जास्त कल शेतीकडे असतो. त्यातील अपवाद म्हणून मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी येथील होतकरू तरुण बबलू उद्धव देवकते होय.पोलिसात नोकरी करायची होती, पण ते झाले प्रगतिशील बागायतदाऱ त्यांची ही यशोगाथा. सन २००८ ला पोलीस भरतीसाठी गेलेले बबलू स्पर्धा पाहूनच हवालदिल झाले. बेरोजगारी खूप असल्याचे त्यांना या पोलीस भरतीतून दिसून आले. त्याच ठिकाणी पोलीस भरती सोडून शेती करायची ठरवलं. वडील उद्धव देवकते यांनी वडिलोपार्जित असलेल्या दोन एकर शेतीचे १२ एकरमध्ये रूपांतर केले होते. या शेतात वेगवेगळे पीक घेऊन प्रगतीचा आलेख वर चढवला.
यावर्षी त्यांनी ८ जानेवारीला ३० गुंठे टरबूज लागवड केली. प्रारंभी त्यांनी या ३० गुंठ्यांत ४० बैलगाड्या एवढे शेणखत टाकले़ नंतर शेतीची योग्यरित्या मशागत करून ट्रॅक्टरच्या सहायाने सहा फूट अंतराने सरी सोडून बेड तयार करून घेतले. सिजेंटाच्या ‘बॉबी’ या वाणाची टरबूज रोपांची १:२५ अंतराने नागमोडी पद्धतीने लागवड केली. ३० गुंठ्यांत एकूण ६००० रोपे लावली. प्रति रोप २ रुपये ८० पैसे प्रमाणे विकत घेतले.
वातावरणात वेळोवेळी होणारे बदल आणि पिकांवर येणारी रोगराई याचे प्रमाण वाढल्याने पिकाची काळजी घेणे गरजेचे असते. बबलू यांनी या तीस गुंठ्यांत फळमाशी फासे २५, किटक फासे २५ व स्टिकर २५ पिकात लावले आहेत. पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन केले़ केवळ २५ दिवसांत या टरबूज वेलला फळ आले. गेल्या २५ दिवसांत देवकते यांनी या पिकाला केवळ सेंद्रिय खते वापरली आहेत. यापैकी ‘जिवामृत’ची मात्रा फायदेशीर ठरते आहे. देशी गाईचे शेण, ताक, गोमूत्र, गूळ, बेसन व पाणी यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून जिवामृत तयार केले. हे मिश्रण ड्रीपमधून व फवारून पिकाला दिले.
तीन लाखांचे उत्पन्न
- टरबूज चालू बाजारात ३५-४० रुपये प्रति किलो भावाने आहे. अजून चाळीस दिवसांत अंदाजे एकूण २० टन एवढे टरबूज निघाल्यास देवकते यांना ४ लाख उत्पन्न मिळणार ग्राह्य आहे. बाजारपेठेत फक्त २० रुपये प्रति किलो धरले तरी हे उत्पन्न साध्य होणार आहे. लागवड खर्च एक लाख वजा केल्यास ३ लाख उत्पन्न सहज मिळणार आहे.
नोकरीचा विचार सोडून शेती केल्याने जीवनात संसाराचे सोने झाले़. आज जर्सी गाई १३, देशी २, कुक्कुटपालन, शेळीपालन व किराणा दुकान यांचा शेतीला जोडधंदा म्हणून आधार मिळाला आहे़ अत्यल्प खर्चातून टरबुजाने मोठे बळ दिले आहे़
- बबलू देवकते, टरबूज उत्पादक