वारीत भाविकांचे संवाद ऐकून अवगत केल्या चार भाषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:38 PM2019-07-12T12:38:15+5:302019-07-12T12:40:09+5:30
विठ्ठल-रूक्मिणी मंदिरातील सुरक्षा रक्षक शिकतात अनेक भाषा
सचिन कांबळे
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी बहुभाषिक येतात. त्यांचे विविध भाषेतील बोल सतत कानावर पडतात. ते बोल ऐकून ऐकून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड या भाषा अवगत झाल्याची माहिती सुरक्षा रक्षक प्रज्ञा येमलवार यांनी सांगितले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रज्ञा येलमवार या मागील १० वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कमी वेळेत चांगले दर्शन घडवण्याचे काम त्या करतात.
श्री विठ्ठलाचा महिमा देशभर प्रसिद्ध असल्याकारणाने देशाच्या विविध कानाकोपºयातून भाविक दर्शनासाठी येतात. यामध्ये दर्शनासाठी येणारे भाविक विविध भाषिक असतात़ प्रत्येक भाविकाला मराठी भाषा समजत नाही. यामुळे पंढरपुरात आल्यानंतर त्यांना अनेक समस्येला तोंड द्यावे लागते. त्याची गैरसोय होत असते.
मंदिरात आल्यानंतर दर्शन रांगेत भाविकांची अनेकवेळा तू-तू मैं-मैं होत असते,परंतु सुरक्षा कर्मचारी प्रज्ञा येमलवार यांनी मंदिरात येणाºया भाविकांच्या माध्यमातून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड या भाषांचे पुरेसे ज्ञान अवगत केले आहे. यामुळे कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी भागातील येणाºया भाविकांशी संवाद साधताना आता अडचणी येत नसल्याचे त्या सांगत होत्या़
त्यांच्याच भाषेत माहिती दिल्याने भाविक समाधानी
- पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी देशातील कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यासह देश-विदेशातून लाखो भाविक येतात. त्यांचे श्रद्धास्थान एक असले तरी भाषा प्रांत मात्र वेगवेगळी आहेत़ त्यामुळे पंढरपुरात आल्यानंतर येथील मराठी भाषा मंदिराचे नियम, अटी त्यांना समजणे अवघड असते. भाषा न येण्यामुळे अनेकदा वादही उद्भवतात; मात्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सुरक्षा रक्षक प्रज्ञा येमलवार हे त्या त्या प्रांतातील भाविकांना त्यांच्या भाषेत मंदिरातील नियम, अटी समजावून सांगतात. भाविकांच्या अडचणी जाणून घेऊन योग्य समुपदेशन केल्याने किरकोळ कारणावरुन होणारे वाद थांबतात़ शिवाय भाविकही दर्शन घेऊन समाधानाने जातात़