त्या चौघी प्रवासी म्हणून रिक्षात बसल्या अन् महिलेच्या गळ्यातील सोने पळविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:48 PM2020-09-10T12:48:15+5:302020-09-10T12:50:34+5:30
२४ तासात लागला शोध: फौजदार चावडी पोलिसांची कारवाई
सोलापूर : केगाव येथील सिंहगड कॉलेजपासून रिक्षात बसून सोलापूरकडे येत असताना प्रवासी महिलेची नजर चुकवून सोन्याचे दागिने चोरलेल्या चार महिलांना फौजदार चावडी पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे.
लक्ष्मी बद्री पवार (वय २७), पद्मिनी शिवाजी भोसले (वय २५), सुरेखा बाबू भोसले (वय ४९), ममता संभाजी भोसले (वय २५, सर्व रा. बिस्मिल्ला नगर, पारधी कॅम्प, मुळेगाव रोड) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. मीनाक्षी वसंत माने (वय ३१, रा. सेलगाव, ता. करमाळा, सध्या रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर) या ८ सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान रिक्षात (क्र. एम.एच.१३ जी ९८९०) बसून सिंहगड कॉलेज येथून एसटी स्टँडकडे येत होत्या.
अटक करण्यात आलेल्या महिलांनी मीनाक्षी माने यांच्या बॅगेतील १७.५ ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण, टॉप्स, साखळी व अंगठ्या असे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून चारही महिलांना अटक केली व चोरलेले दागिने हस्तगत केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अल्ताफ शेख, पोलीस नाईक डोके, सादिक शेख, पोलीस कॉन्स्टेबल बाबर, फुटाणे, शिर्के, हटकर, कोळवले आदींनी पार पाडली.