वैरागमध्ये आढळले म्युकरमायकोसिसचे चार रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:17 AM2021-06-05T04:17:05+5:302021-06-05T04:17:05+5:30
वैराग : वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत म्युकरमायकोसिसचे चार रुग्ण आढळून आले आहेत. ही बाब चिंताजनक असून नागरिकांनी काळजी घ्यावी, ...
वैराग : वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत म्युकरमायकोसिसचे चार रुग्ण आढळून आले आहेत. ही बाब चिंताजनक असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे अवाहन वैद्यकीय अधिकारी जयवंत गुंड यांनी केले आहे.
वैराग आरोग्य केंद्रा अंतर्गत ४० हजार लोकसंख्येच्या वैराग शहरासह १३ गावे येतात. तीन महिन्यांपूर्वी वैराग शहरासह परिसरातील ३० गावे कोरोनामुक्त झाली होती. मात्र सध्या प्रत्येक गावात कमी-अधिक प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आहेत. याच काळात म्युकरमायकोसिस या आजाराचा प्रादुर्भाव झालेला असून या आजाराचे वैराग शहरात दोन तर धामणगाव व पिंपरी येथे एक-एक असे दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. हे बाधित रुग्ण सोलापूर येथे उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दरम्यान, २० दिवसांपूर्वी आढळलेल्या रुग्णांवर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, एक डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रियादेखील केली आहे. उर्वरित दोन रुग्ण हे संशयित निघाले असून त्यांनाही ही पुढील उपचार घेण्यास सोलापूर येथे हलविण्यात आले आहे.
कोणत्याही व्यक्तीला अंगदुखी, ताप या लक्षणाबरोबर दात दुखणे, दातात मुंग्या आल्यासारखे होत असेल किंवा इतर कोणता आजार उद्भवल्यास तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी जयवंत गुंड यांनी केले आहे.