भीमा नदीच्या पाण्यात तीन मुलींसह चौघे गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:19 AM2021-05-30T04:19:42+5:302021-05-30T04:19:42+5:30
सोलापूर : भीमा नदीच्या पात्रात पोहायला शिकण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुली आणि मुलगा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. दक्षिण सोलापूर ...
सोलापूर : भीमा नदीच्या पात्रात पोहायला शिकण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुली आणि मुलगा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथे दुपारी ३.३०च्या दरम्यान ही घटना घडली.
समीक्षा शिवाजी तानवडे (वय १३), अर्पिता शिवाजी तानवडे (वय १२) , आरती शिवानंद पारशेट्टी (वय १२) आणि विठ्ठल शिवानंद तानवडे (वय १०) अशी भीमा नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या चार शाळकरी मुलांची नावे आहेत. शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही चारही मुले लवंगीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकत होती.
उजनी धरणातून नुकतेच भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी शुक्रवारी सायंकाळी लवंगी हद्दीतील पात्रात पोहोचले. दुपारपर्यंत पाण्याचा प्रवाह वाढत राहिला. शिवाजी रामलिंग तानवडे (वय ४०) हे भीमा नदीत पोहायला गेले होते. काही वेळाने त्यांच्या पाठीमागे त्यांच्या दोन मुली समीक्षा व अर्पिता आणि मेहुणे शिवानंद पारशेट्टी यांचा मुलगा विठ्ठल आणि मुलगी आरती असे चौघे नदीकडे आले असता त्यांना घराकडे परत पाठवून दिले होते. शिवाजी हे नदीत पोहोत राहिले.
काही वेळाने ते चौघे पुन्हा नदीकडे आले आणि पाण्यात उतरले. नदीपात्राच्या शेजारी तीन फुटाचे पाण्याचे डबके होते. या डबक्यात पोहण्याचा मोह चारही मुलांना झाला. समीक्षाला थोडेसे पोहता येत होते. समीक्षा पाण्यात पोहत असताना आरतीने तिला पकडले आणि अर्पिताला विठ्ठलने पकडल्याने ते चौघेही बुडत होते. याचदरम्यान त्यांच्या ओरडण्याने समीक्षाचे वडील शिवाजीे पोहोत जाऊन समीक्षा व आरतीला किनाऱ्यावर आणून सोडून कडेला जाण्यास सांगितले. अर्पिता व विठ्ठल यांना कडेला आणत असतानाच किनाऱ्यावर सोडलेले समीक्षा व आरती त्यांच्या डोळ्यादेखत पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन बुडाल्या. या साऱ्या प्रकारात अर्पिता आणि विठ्ठलही त्यांच्या हातातून निसटले. चारही मुलं बुडाल्याने शिवाजी यांचा धीर सुटला तेही बुडता असताना शिवाजीचे नातलग राचप्पा उर्फ अप्पू संगप्पा परशेट्टी यांनी त्याला बाहेर काढले.
---
...अन तानवडे कुटुंब लवंगीत स्थायिक झाले
पारशेट्टी मूळचे लवंगीचे तर तानवडे कुटुंब वाघोलीचे. शिवाजी तानवडे यांना शिवानंद पारशेट्टी यांची बहीण दिल्याने तानवडे कुटुंब लवंगी येथेच काही वर्षांपासून वास्तव्यास आले आहे. दोन्ही कुटुंबांचा व्यवसाय शेतीचा. समीक्षा आणि आरती हे आठवीच्या, तर अर्पिता आणि विठ्ठल सातवीच्या वर्गांत शिकत होते. पारशेट्टी यांना आरती, विठ्ठल हे दोनच अपत्य, तर शिवाजीला समीक्षा आणि अर्पिता या दोन्ही मुलीच होत्या.
--------
गाव आलं मदतीला
शिवानंद पारशेट्टी यांचा आक्रोश ऐकून लवंगी गावातील लहान थोर नदीकडे धावले. त्यातील काही तरुण नदीकाठाने प्रवाहाबरोबर धावत बुडणाऱ्या मुलांचा शोध घेत होते. परंतु मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नाला यश आले नाही. उशिरापर्यंत ग्रामस्थ त्यांचा शोध घेत होते.
-------