६५ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांसह चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:24 AM2020-12-06T04:24:29+5:302020-12-06T04:24:29+5:30
सदर बाजार पोलिसांत गुन्हा : वेतन अधिकार्यांसह दोन मुख्याध्यापकांचा समावेश सोलापूर : महाराष्ट्र शासनाचा बनावट आदेश काढून ६५ लाख ...
सदर बाजार पोलिसांत गुन्हा : वेतन अधिकार्यांसह दोन मुख्याध्यापकांचा समावेश
सोलापूर : महाराष्ट्र शासनाचा बनावट आदेश काढून ६५ लाख ३७ हजार १७१ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांसह चौघाविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका वेतन अधिकाऱ्यासह दोन मुख्याध्यापकांचा समावेश आहे.
तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रदीप सदाशिव मोरे, वेतन अधिकारी आजराशिरीन धाराशिवकर, मुख्याध्यापिका बिस्मिल्ला गैबुसाब हुलकुंद, अफरोजहा उस्मान पेरमपल्ली (सर्व, रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. २००९ साली मुस्लीम छप्परबंद उर्दू प्राथमिक शाळा व नरूल हुदा एज्युकेशन सोसायटी संचालित महाराष्ट्र उर्दू प्राथमिक शाळामधील शिक्षक व कर्मचाऱ्यांचा पगार काढण्यासाठी शासनाची परवानगी नसताना दि. २८ एप्रिल ते दि. ७ ऑगस्ट २००९ दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रदीप मोरे यांनी ६५ लाख ३७ हजार १५१ रुपयांचे अनुदानाचा आदेश काढला. काढलेले अनुदान दोन्ही शाळांमध्ये वितरित करण्यात आला. हा गैरप्रकार लक्षात आल्यानंतर विद्यमान शिक्षणाधिकारी संजयकुमार धर्मा राठोड (बजरंग हौसिंग सोसायटी, विजापूर रोड) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.