वांगी नंबर एकमध्ये चार पाळीव श्वानांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:18 AM2020-12-26T04:18:31+5:302020-12-26T04:18:31+5:30
करमाळा : वांगी नं.१ शिवारात बिबट्याचा वावर सुरू असून, अजूनही सर्वसामान्यांच्या मनातून भीती उतरलेली नाही. अशा स्थितीत शुक्रवारी रात्री ...
करमाळा : वांगी नं.१ शिवारात बिबट्याचा वावर सुरू असून, अजूनही सर्वसामान्यांच्या मनातून भीती उतरलेली नाही. अशा स्थितीत शुक्रवारी रात्री मयूर जाधव यांच्या वस्तीवर चार पाळीव श्वानांवर हल्ला झाला आणि या हल्ल्यात श्वान मरण पावले आहेत. सर्वसामान्यांच्या मते हा हल्ला बिबट्याकडून झाला आहे तर उप-वनसंरक्षकांच्या मते हा हल्ला तरसाने केला आहे. यापूर्वी वांगी नंबर चार येथील राखुंडे यांच्या केळीच्या बागेत वन विभागाच्या कारवाईत बिबट्या मारला गेल्यानंतरही वांगी नं.१ येथील धनाजी भागवत देशमुख यांना शेतात आणखी एका बिबट्याचे दर्शन झाले होते.
यानंतर वन विभागाचे पथक धनाजी देशमुख यांच्या शिवारात येऊन पावलांचे ठसे घेऊन गेले. हे पथक अद्यापपर्यंत इकडे फिरकलेच नाही. शुक्रवार, २५ डिसेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास वांगी नं.१ येथील शिवारात मयूर जाधव यांच्या वस्तीवरील चार पाळीव कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
----
वन अधिकाऱ्यांना पाठवले श्वानांचे फोटो
मयुर जाधव यांच्या वस्तीवरील पाळीव चार कुत्र्याच्या मृत्यूनंतर काही जागरुक नागरिकांनी पावलांचे ठसे, मरून पडलेल्या श्वानांचे फोटो वन विभागाला मोबाइलवर पाठविले.
बिटरगावचे महेंद्र पाटील यांनी सोलापूर वन विभागाचे उप-वनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, श्वानावरील हल्ला बिबट्याने केलेला नसून, तो तरसाने केल्याचे म्हटले; मात्र हा हल्ला बिबट्याने केल्याचे मत महेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.
---
रात्री कुत्री भुंकण्याचा आवाज आला; पण नेहमीप्रमाणे ते भुंकत असतील असे वाटल्याने आम्ही त्यावेळी उठलो नाही. सकाळी उठल्यावर चारही कुत्री मरून पडल्याचे निदर्शनास आले.
- मयूर जाधव