‘आयटीआय’ प्रवेशासाठी चार हजार अर्ज; दहावीबरोबरच प्रक्रिया असल्याने संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 04:04 PM2021-08-05T16:04:51+5:302021-08-05T16:04:56+5:30
दोन्ही फॉर्म भरावे लागतात : सीईटी परीक्षा काही दिवसांवर; विद्यार्थी लागले अभ्यासाला
सोलापूर : दहावीचा निकाल लागल्यापासून अकरावी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे; पण अकरावी प्रवेशासाठी सीईटी जरी बंधनकारक नसली तरी ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा कल हा सीईटी देण्याकडे आहे. त्यातच आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या दोन्ही प्रवेश प्रक्रिया एकदम सुरू झाल्यामुळे आतापर्यंत आयटीआय प्रवेशासाठी जवळपास चार हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.
प्रतिवर्षी अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया संपताना आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू होते. अकरावीत प्रवेश न घेऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशाची संधी मिळत असते. यंदा दोन्ही प्रवेश प्रक्रिया एकाच वेळी सुरू झाल्यामुळे विद्यार्थी प्रवेश फॉर्म भरताना गोंधळात पडत आहेत. तसेच विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढल्यामुळे विज्ञान शाखेकडे जाण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना आयटीआय करायचे असते ते विद्यार्थी हमखास फॉर्म भरत आहेत; पण चांगली टक्केवारी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाचा प्रश्न पडला आहे.
यंदा दहावीत उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश मिळूनही जवळपास १० ते १५ हजार जागा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. तसेच आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा बदल करण्यात आला असून ९०:१० चा फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश मिळण्यास प्राधान्य मिळणार आहे.
विद्यार्थ्यांनी आयटीआय फॉर्म भरून, ११ वीची सीईटी दिली तरी चालेल. विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये कमी गुण मिळाल्यास ते विद्यार्थी आयटीआयमध्ये प्रवेश देऊ शकतात. यामुळे विद्यार्थ्यांनी आयटीआयचाही फॉर्म भरावा.
- इस्माईल सलगर, प्र. प्राचार्य
यंदा प्रवेश घेताना विद्यार्थी गोंधळलेले दिसून येत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर आयटीआय करायचा आहे ते विद्यार्थी मात्र आयटीआयचा फॉर्म भरत आहेत. सध्या फॉर्म भरायचे काम सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल लक्षात येणार नाही.
- सुरेंद्र शिंदे, प्राचार्य, विजापूर नाका आयटीआय
अकरावीची प्रवेश जरी सीईटीवरून असली तरी आयटीआय केल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मी आयटीआय करण्याचा निर्णय घेतला आहे.
- लक्ष्मी गुरव, विद्यार्थिनी
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा मी फॉर्म भरला आहे. ही परीक्षा देईपर्यंत आयटीआयची प्रवेश प्रक्रिया संपेल, अशी भीतीही वाटत आहे. त्यामुळे मी आयटीआयचाही फॉर्म भरला आहे; पण मी सीईटीची तयारी सुरू केली आहे.
- अंकुश कांबळे, विद्यार्थी
- जिल्ह्यातील दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थी - ६७५२७
- अकरावीच्या जागा - ७६७३६
- आतापर्यंत आयटीआयसाठी आलेले अर्ज - ४०००
- जिल्ह्यातील आयटीआयच्या जागा - ५३०४
- शासकीय जागा - २५७२
- खाजगी जागा - २७३२