उजनीतून चार हजार क्युसेकने सोडले पाणी; कार्तिकी एकादशीला भाविकांचे होणार स्नान
By काशिनाथ वाघमारे | Published: November 19, 2023 02:08 PM2023-11-19T14:08:02+5:302023-11-19T14:08:32+5:30
या पाण्याचा उपयोग २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला येणा-या भाविकांबरोबरच भीमा नदी काठावरील गावांसाठी पाणीपुरवठा योजनांसाठीही होणार आहे.
काशिनाथ वाघमारे, सोलापूर : पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीला येणा-या भाविकांसाठी उजनी धरणातून चार हजार क्युसेकने भीमेत पाणी सोडण्यात आले आहे. शनिवार १८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता उजनीतून भीमा नदीत दोन हजार क्यूसेकने पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला. त्यात रविवारी वाढ करून धरणाच्या दरवाज्यातून २४०० क्युसेक व विद्युत प्रकल्पाद्वारे १६०० क्युसेक असे एकूण ४००० क्युसेकने भीमा नदीपत्रात पाणी सोडण्यात येत आहे.
हा प्रवाह २२ नोव्हेंबर पर्यंत चालू राहणार आहे. त्यासाठी धरणातील अंदाजे दीड टीएमसी पाण्याचा वापर होणार असल्याचे उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत माने यांनी सांगितले.
या पाण्याचा उपयोग २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला येणा-या भाविकांबरोबरच भीमा नदी काठावरील गावांसाठी पाणीपुरवठा योजनांसाठीही होणार आहे. मागील वर्षी याच तारखेला धरणातील एकूण जलसाठा १२३.२८ टीएमसी तर उपयुक्त जलसाठा ५९.६२ टिएमसी एवढा होता. टक्केवारी १११.२८ होती. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी ३६.८९ टीएमसी साठा कमी आहे.
धरणाची सद्यस्थिती :
* एकूण पाणीपातळी : ४९३.८८० मिटर
* एकूण जलसाठा : ८६.३९ टीएमसी
* उपयुक्त जलसाठा : २२.७३ टीएमसी
* टक्केवारी : ४२.४३
आऊट फ्लो
* सीना माढा उपसा : ३३३ क्युसेक
* दहिगाव उपसा : १२० क्युसेक
* बोगदा : ९०० क्युसेक
* मुख्य कालवा : २४०० क्युसेक
* विद्युत प्रकल्प : १६०० क्युसेक