सोलापुरात आगीमुळे एका वर्षात चौदा कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 11:15 AM2020-04-15T11:15:42+5:302020-04-15T11:16:54+5:30
अग्निशमन दिनी हुतात्म्यांचे स्मरण; ३९२ आगी विझवल्या; एक कोटीवर किमतीची मालमत्ता वाचवली
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातर्फे वर्षभरात शहर व जिल्ह्यातील ३९२ आगी विझवण्यात आल्या आहेत. दरम्यानच्या काळात १३ कोटी ८१ लाख २८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र एक कोटी ३१ लाख ५० हजार रुपयांची मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन दलास यश आले आहे. आजच्या अग्निशमन दिनी आग विझविताना शहीद झालेल्या अधिकारी व जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
सोलापूर महानगरपालिका अग्निशमन दल हे नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करीत २४ तास विनामूल्य सेवा उपलब्ध आहे. शहरात एकूण पाच ठिकाणी अग्निशमन केंद्रे आहेत. सध्या दलाकडे सर्व मिळून ९ गाड्या असून त्यापैकी एका अपघाताच्या वेळी त्वरित मदत करण्यासाठी एक स्पेशल अॅडव्हान्स रेस्क्यू टेंडर गाडी आहे. अरूंद रस्ते व लहान गल्लीबोळमधील आग विझवण्याकामी एक मिनी फायटर वाहन, दोन फोम टेंडर फायटर गाड्या उपलब्ध आहेत.
फोम टेंडर फायटर वाहनाचा उपयोग विमानतळ बंदोबस्त अथवा केमिकलच्या आगीवर अत्यंत उपयुक्त आहे. महापालिका हद्दीत आग विझवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. शहरातील जनतेसाठी आग, अपघात आणि आणीबाणीप्रसंगी २४ तास विनामूल्य सेवा उपलब्ध आहे. महापालिका हद्दीत वर्षभरात ३ हजार ८१ आगी विझवण्यात आल्या आहेत. ४५ अपघात ठिकाणी मदतकार्य केले आहे. ११ कोटी ४२ हजार ७८ हजार ४५२ रुपये किमतीचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र ५ लाख ५० हजार रुपये किमतीची मालमत्ता वाचवण्यात यश आले आहे.
महापालिका हद्दीबाहेर ११ आगी विझवण्यात आल्या आहेत, ६ अपघात मदतकार्य केले आहे. २ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे मात्र १ कोटी २६ हजार रुपये किमतीची मालमत्ताा वाचवण्यात यश आले आहे.
हुतात्म्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो दिन...
- दि. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदीत झालेल्या प्रचंड स्फोटामध्ये मोठी आग लागली होती. ही आग विझवताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ कर्मचाºयांना आपले प्राण गमवावे लागले होते. अग्निशमन अधिकारी/कर्मचारी यांच्या स्मरणार्थ केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार अग्निशमन दिन साजरा केला जातो.
आग ही आपोआप कधी लागत नाही, बºयाच वेळेला आपला निष्काळजीपणा व नियम न पाळल्याने लागत असते. आपला शत्रू समजून त्याच्यापासून स्वत:चे व मालमत्तेचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे काम आहे.
- केदार आवटे, अधीक्षक, अग्निशमन दल.