कालबाह्य धनादेश देऊन महिला दुकानदाराची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:20 AM2021-02-07T04:20:27+5:302021-02-07T04:20:27+5:30
बाळासाहेब नारायण मोरे व सचिन ऊर्फ मारुती भोर रा.ग्रीनपार्क बारामती यांनी २६ डिसेंबर रोजी ४ लाखांचे अँगल ...
बाळासाहेब नारायण मोरे व सचिन ऊर्फ मारुती भोर रा.ग्रीनपार्क बारामती यांनी २६ डिसेंबर रोजी ४ लाखांचे अँगल खरेदी करून त्यातील २ लाख ८० हजाराचा धनादेश दिला होता. तो न वटल्याने सुचिता महावीर शेळके रा. सुर्डी यांनी तालुका पोलिसात फसवणुकीची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून याचा तपास सुरू केला. या घटनेचा तपास सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, पोलीस नाईक अभय उंदरे, सचिन माने, धनजय फत्तेपुरे यांनी बारामती येथे जाऊन केला व तेथूनच वरील दोघाना अटक करून बार्शीत आणले. शनिवारी न्यायालयात उभे करताच ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
चुकीचे नाव सांगून उचलला माल
डिसेंबरमध्ये दोघे जण लोखंडी ॲगल खरेदीसाठी आल्यानंतर एकाने सचिन घाडगे रा.सालसे ता.करमाळा असे चुकीचे नाव सांगितले. नंतर द्राक्ष बागेसाठी ७ टन लोखंडी अँगल खरेदी करावयाचे त्याचे पैसे माल पोहोच झाल्यानंतर देतो, असे सांगून दुकानाच्या ट्रकमधून ४ लाख रुपयांचा ७ टन लोखंडी अँगल सांगितलेल्या ठिकाणी पोहोच केले. माल उतरल्यानंतर पैसे रोख न देता त्यांनी ॲक्सिस बँक बारामती शाखेचा २ लाख ८० हजाराचा धनादेश देऊन राहिलेले रोख दुकांनी घेऊन येतो, असे सांगितले. त्यांच्यावर फिर्यादीने विश्वास ठेवला. त्यानंतर तो चेक बँकेत जमा केला असता तो कालबाह्य झाला असल्याचे व त्यांच्या खात्यात रक्कम नसल्याचे समजताच फसवणूक झाल्याचे लक्षात आहे. त्यानुसार पोलिसात तक्रार दिली.