कर्नाटकातील कंपनीने केली सोलापूरातील गुंतवणुकदारांची फसवणुक
By admin | Published: April 8, 2017 12:35 PM2017-04-08T12:35:43+5:302017-04-08T12:35:43+5:30
.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ८ : कर्नाटकातील कंपनीकडून सोलापूरकरातील गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याची घटना शनिवारी समोर आली़ याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात कंपनीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर शहर कसून तपास करीत आहे़
सेव्हन हिल्स रियालिटीज प्रा़ लि़ ही कर्नाटक राज्यातील कंपनी आहे़ या कंपनीचे मुख्य कार्यालय डिव्हिजी रोड, ज्युनिअर कॉलेजच्याजवळ, आदर्श नगर, मालूर जि़ होसूर, राज्य : कर्नाटक येथे आहे़ या कंपनीने शहरातील ठेवीदारांना पिग्मी योजना, रिकरिंग डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट, कल्याण योजना, विद्या योजना, दामदुप्पट योजना, मंथली इनकम, सुवर्ण योजना अशा ७ प्रकारच्या योजनेमध्ये गुंतवणुक करण्यास लावले होते़ याचवेळी कंपनीने गुंतवणुकरांना जास्त रकमेच्या परतफेडीची हमी दिली होती़ परंतू या कंपनीने मार्च २०१५ पासून सोलापूर येथील नवीपेठ, मोबाईल गल्ली, मुरारजी पेठ, सोलापूर येथील शाखा कार्यालय बंद केले़ शिवाय ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवीची रक्कम व मॅच्युरिटी झालेली रक्कमेची परतफेड करणे बंद करून ठेवीदारांचा विश्वासघात करून फसवणुक केली़ याप्रकरणी संतोष वसंतराव शिर्के (वय ४५ रा़ १६/१ स्वामी समर्थ हौसींग सोसायटी, सम्राट चौक, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि एस़ एस़ पवार हे करीत आहेत़
------------------------
कागदपत्रासह तक्रार नोंदविण्याचे आवाहन
सोलापूर शहरताील सेव्हन हिल्स रियालिटीज प्रा़ लि़ या कंपनीत ज्या ठेवीदारांनी ठेव स्वरूपात गुुंतवणुक केलेली आहे़ त्यांना कंपनीकडून परतावा मिळालेला नसेल त्या ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांच्याकडे मुळ कागदपत्रासह हजर राहुन तक्रार नोंदवावी असे आवाहन शहर पोलीसांनी केले आहे़