क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी ओटीपी सांगताच दीड लाख रुपयांची फसवणूक
By दिपक दुपारगुडे | Published: August 10, 2023 08:03 PM2023-08-10T20:03:34+5:302023-08-10T20:03:44+5:30
चंदनशिवे मार्च २०२३ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पंढरपूर शाखेत पेन्शनवर कर्ज काढण्यासाठी गेले.
सोलापूर : बोहाळी (ता. पंढरपूर) येथील एका व्यक्तीने मोबाइलवर फोन आल्यानंतर त्रयस्थ व्यक्तीला क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी ओटीपी सांगितला अन् त्यांची १ लाख ४९ हजार ८१८ रुपयांनी फसवणूक झाली, अशी तक्रार बुधवारी दुपारी ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुदाम दगडू चंदनशिवे (वय ६३, रा. बोहाळी, ता. पंढरपूर) यांच्या मोबाइलवर ‘तुम्हाला क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी ओटीपी येईल. ते आम्हास लगेच सांगा’, असा २५ नोव्हेंबर २०२२ रोजी फोन आला. त्यावर त्यांना काल ओटीपी दिला आहे. अजून कशाकरिता, असे चंदनशिवे म्हणाले. त्यावेळी समोरील व्यक्ती म्हणाली की, तुम्हाला तीनवेळा ओटीपी येईल. ते आम्हाला सांगा. त्यानंतर तुमचे क्रेडिट कार्ड बंद होईल. त्यामुळे चंदनशिवे यांनी तीनवेळा ओटीपी सांगितला. त्यानंतर तुमचे क्रेडिट कार्ड बंद झाले आहे, असे सांगून समोरील व्यक्तीने फोन कट केला.
चंदनशिवे मार्च २०२३ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पंढरपूर शाखेत पेन्शनवर कर्ज काढण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना क्रेडिट कार्डवरून १ लाख १७ हजार रुपये वापर केला आहे, असे बँकेतून समजले. त्यावेळी त्यांनी बँकेत क्रेडिट कार्ड वापरत नसल्याचे सांगितले. यावर त्यांना बँकेतील लोकांनी सोलापूर येथील क्रेडिट कार्ड ऑफिसमध्ये जाण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी चंदनशिवे तेथे गेल्यावर सर्व कागदपत्रे व क्रेडिट कार्ड ऑनलाइन तपासले असता कार्डवरून १ लाख ४९ हजार ८१८ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बनकर या करीत आहेत.