दुधाच्या विक्रीतून ४३ लाख रुपयांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:27 AM2021-06-09T04:27:58+5:302021-06-09T04:27:58+5:30
उत्तर सोलापूर : एक लाख ८८ हजार ७९१ लीटर दुधाची खोटी विक्री दाखवून, सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची ...
उत्तर सोलापूर : एक लाख ८८ हजार ७९१ लीटर दुधाची खोटी विक्री दाखवून, सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची ४२ लाख ७३ हजार ३१६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संघाचे बडतर्फ व्यवस्थापकीय संचालक सतीश लिंबराज मुळे व दूध खरेदीदार बाळकृष्ण शंकर पवार यांच्या विरोधात फिर्याद संघाचे सहायक व्यवस्थापक विनायक कदम यांनी फिर्याद दाखल केली आहे.
प्रशासकीय मंडळाच्या कणखर भूमिकेमुळे संघात काळेबेरे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सांगली जिल्ह्यातील उरण (इस्लामपूर) येथील कालिका अमृत दूध डेअरीला सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने एक लाख ८८ हजार ७९१ लीटर दूध दिले होते. याची किंमत ४२ लाख ७३ हजार ३१६ रुपये इतकी होते. संघाच्या ८ शीतकरण केंद्रात होणारे संकलन दूध किरकोळ व टँकरद्वारे विक्री केले जाते. यासाठी दूध घेऊ इच्छिणाऱ्याने लेखी मागणी अर्ज व अपेक्षित दर घेतला जातो. ही मागणी संचालक मंडळ सभेसमोर ठेवून रीतसर परवानगी दिली जाते. त्यासाठी करार करून दुधापोटी मिळणाऱ्या रकमेची राष्ट्रीयकृत बँकेची बँक गॅरंटी घेतली जाते. मात्र, कालिका अमृत डेअरीला दूधपुरवठा करताना कसलीही परवानगी दिली नाही आणि संचालक मंडळासमोर जाणीवपूर्वक मंजुरीसाठी
ठेवले नाही. संचालक मंडळाची कसलीही परवानगी न घेता व कोणताही करार न करता, संगणमत करून स्वतःच्या फायद्यासाठी एक लाख ८८ हजार ७९१ लीटर दूध बाळकृष्ण पवार यांना टॅकरद्वारे पाठविले. यामुळे संघाचे ४२ लाख ७३ हजार ३१६ रुपयांची फसवणूक झाली. ती संघाचे बडतर्फ व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे व कालिका अमृत डेअरीचे बाळकृष्ण पवार यांनी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे,
---
संस्थाच नाही... दूध दिले कसे?
ज्या कालिका अमृत डेअरीला दूधपुरवठा केला आहे, ती संस्थाच आहे की नाही, दूध विक्रीचा परवाना आहे का, याची तपासणी केली नाही. हे फिर्यादीत नमूद केले आहे. याचा खुलासा व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे यांना विचारला असता, २८ जुलै, २०२० रोजीच्या संचालक सभेत मंजुरी घेतल्याचे दाखविले. मात्र, ठरावच घेतला नसताना इतिवृत्तात खाडाखोड केली.
---
‘लोकमत’ने आणले उघडकीला
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर प्रशासक आल्यानंतर हे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीला आणले होते. त्यानंतर, प्रशासकीय मंडळाने याची दखल घेत, तपासणी करून संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या.
---
हे दूध पंढरपूर येथील शीतकरण केंद्रातून पुरवठा केले होते. त्यामुळे पंढरपूर शीतकरण केंद्राचे प्रमुख रावसाहेब लेंडवे व वितरण अधिकारी डाॅ.विजयकुमार भडंगे यांना नोटीस देऊन खुलासा विचारला. लेंडवे यांनी वितरण अधिकारी डाॅ.भडंगे व वरिष्ठांच्या तोंडी आदेशानुसार दूध पाठविल्याचे खुलाशात म्हटले. वितरण अधिकारी डाॅ.भडंगे यांनी दूध विक्री नियोजन संचालक मंडळ व कार्यकारी संचालक करतात, असा खुलासा केला आहे.
--
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे ज्यांनी- ज्यांनी नुकसान केले आहे, ते संबंधित जबाबदारांकडून वसूल केले जाईल. त्याप्रमाणे, काही प्रकरणांची तपासणी झाली आहे. काही प्रकरणांची तपासणी सुरू आहे.
- श्रीनिवास पांढरे, अध्यक्ष, प्रशासकीय मंडळ