शेतकऱ्याच्या नावावर परस्पर कर्ज काढून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:22 AM2021-01-23T04:22:27+5:302021-01-23T04:22:27+5:30
बार्शी : तुर्कपिंपरी येथील बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष यांनी बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन शाखाधिकारी यांच्याशी संगनमत करून ...
बार्शी : तुर्कपिंपरी येथील बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष यांनी बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन शाखाधिकारी यांच्याशी संगनमत करून श्रीहरी श्रीपती शिंदे (रा. बाभूळगाव, ता.बार्शी) या शेतकऱ्याच्या नावावर त्रयस्त व्यक्तीला उभे करून बनावट सह्या करून तीन लाखांचे कर्ज काढले. पोलिसांनी दखल न घेतल्याने थेट न्यायालयात खासगी फिर्याद दाखल झाली आहे.
न्यायाधीश आर. एस. धडके यांनी संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश बँक आफ इंडिया (ढगे मळा, बार्शी)चे तत्कालीन शाखाधिकारी, अधयक्ष रणजितसिंह बाबनराव शिंदे आणि अन्य एक अनोळखी व्यक्ती या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
फिर्यादी श्रीहरी शिंदे यांनी याबाबत न्यायालयात अड. आर. यू. वैद्य आणि अड. के. पी. राऊत यांच्या माध्यमातून न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली.
फिर्यादी श्रीहरी यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार कर्ज मागणी करण्यात आली. त्यानंतर बँक खाते उघडून श्रीहरी शिंदे यांच्या नावे कर्ज मंजूर दाखवून रक्कम खात्यावर टाकले. शाखाधिका-यांनी परस्पर तीन लाख रुपये अध्यक्ष यांना दिले. कर्जप्रकरणास रणजितसिंह शिंदे हेच जामीन राहिले आहेत. हे बनावट कर्जही जामीनदारालाच बँकेने दिल्याचे दाखवले.
त्यानंतर शिंदे यांना सप्टेंबर २०१९ मध्ये बँकेच्या वकिलाकडून कर्जवसुलीची व्याजासह ३ लाख ९३ हजार २०३ रुपयांची नोटीस आली. त्यांनी अध्यक्ष रणजित शिंदे याच्याकडे जाऊन चौकशी केली असता व्याजासह कर्ज भरण्याचे कबूल केले मात्र, ती रक्कम भरली नाही. त्यामुळे तक्रादाराच्या दोन मुलींना उच्च शिक्षणासाठी कर्जही दुसऱ्या बँकेत मिळाले नाही. त्यानंतर श्रीहरी शिंदे यांनी ३ नोव्हेंबर २०२० मध्ये खासगी फिर्याद न्यायालयात दाखल केली. न्यायालयांने या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले.