प्रतीक्षा यादीतील मुलांना १२ जूनपर्यंत मोफत प्रवेश; पालकांना येईल एसएमएस; पोर्टलवर अपडेट
By शीतलकुमार कांबळे | Published: May 31, 2023 02:43 PM2023-05-31T14:43:59+5:302023-05-31T14:44:46+5:30
सर्व जिल्ह्यांमध्ये मंगळवार ३० मे पासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे.
सोलापूर : शिक्षणाचा हक्क कायदाअंतर्गत (आरटीई) मोफत प्रवेशासाठी मुदत संपली आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. यासाठीची अंतिम मुदत १२ जून अशी आहे.
सर्व जिल्ह्यांमध्ये मंगळवार ३० मे पासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. २९ मे पासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएस पाठविण्यात येत आहेत. पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता आटीईच्या पोर्टलवर जाऊन अर्जाची स्थिती पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी त्यांच्या लॉगईनमधून अॅलोटमेंट लेटरची प्रिंट काढायची आहे. आवश्यक कागदपत्रे घेऊन नजिकच्या कार्यालयात जाऊन कागदत्रांची तपासणी करुन घ्यायची आहे. त्यानंतर शाळेत प्रवेश निश्चित करायचा आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा राज्यातील ८ हजार ८२३ शाळांतील १ लाख १ हजार ८४६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी एकूण ३ लाख ६३ हजार ४१३ अर्ज दाखल झाले आहेत.
जिल्ह्यातील आरटीई स्थिती
आरटीई शाळा - २९५
प्रवेशासाठीच्या जागा - २३२०
एकूण अर्ज - ७७३८
प्रवेश - १४६४