मुक्त पक्षी बर्ड फ्लूपासून मुक्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:20 AM2021-01-17T04:20:15+5:302021-01-17T04:20:15+5:30
करमाळा : देशी-विदेशी व स्थलांतरित पक्ष्यांचे ‘माहेरघर’ असणाऱ्या उजनी जलाशय परिसरात अद्यापपर्यंत एकही पक्षी बर्ड फ्लूने मरण ...
करमाळा : देशी-विदेशी व स्थलांतरित पक्ष्यांचे ‘माहेरघर’ असणाऱ्या उजनी जलाशय परिसरात अद्यापपर्यंत एकही पक्षी बर्ड फ्लूने मरण पावलेला नाही. उजनी जलाशयासाठी दिलासा देणारी ही बाब ठरली आहे.
उजनी जलाशयावर दरवर्षी असंख्य देशी पक्ष्यांबरोबरच स्थलांतरित, विदेशी पक्षी हजेरी लावतात. यंदा उजनी जलाशय तुडुंब भरलेले असताना वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे काठावर पक्ष्यांची संख्या घटली आहे. कारण जलाशयातील पाणवठे, पाणथळ जागा, दलदलीचे ठिकाण अद्यापही पाण्याखालीच आहेत. अतिवृष्टीनंतर सर्व धरणे, तलावांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी साठा झाला आहे.
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर उजनी लाभक्षेत्रात सतर्कता पाळत आहेत. याबाबत उजनी धरण लाभ क्षेत्रात पाहणी सुरू आहे. पशुसंवर्धन खात्यामार्फत जनजागृतीही करण्यात येत आहे.
तालुक्यात चार अतिदक्षता पथके
तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांच्या कार्यक्षेत्रातील पोल्ट्री फार्मची पाहणी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत आहे. ते ग्रामस्थांच्या संपर्कातही आहेत. तालुक्यात चार अतिदक्षता पथके तयार करण्यात आली आहेत. अद्यापपर्यंत तरी तालुक्यात कुठे मृत पक्षी आढळून आलेले नाहीत. उजनी लाभक्षेत्रातील केत्तूर, वाशिंबे, उमरड येथील पशुवैद्यकीय अधिकारी याबाबत सतर्क आहेत. त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
किलबिलाट कमी झाला
करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली, कात्रज, डिकसळ, केत्तूर, गोयेगाव, वाशिंबे, सोगाव, कुगाव, टाकळी, कंदर, वांगी, कात्रज, चिकलठाण, गौळवाडी, खातगाव, पोमलवाडी, रामवाडीसह इंदापूर तालुक्यांतील डिकसळ, कुंभारगाव, पळसदेव, भादलवाडी, आगोती, गंगा वळण या उजनी लाभक्षेत्रातील गावांत पक्ष्यांचा किलबिलाट यावर्षी कमी झालेला दिसताेय. उजनीचे आकर्षण असणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचेही आगमन अद्याप झालेले नाही.
पाणलोट क्षेत्रात स्थलांतरित पक्ष्यांसह स्थानिक पक्ष्यांची वर्दळ तुलनेने कमी आहे. मात्र, काही दिवसांत पाण्याचा विसर्ग होणार आहे
- डॉ. अरविंद कुंभार
पक्षी अभ्यासक
फोटो : १६ करमाळा बर्ड
संग्रहीत छायाचित्र