रेल्वेत फुकटे प्रवासी वाढले; साडेपाच लाख फुकट्या प्रवाशांना ठोठावला ३५ कोटींचा दंड
By Appasaheb.patil | Published: January 11, 2023 01:55 PM2023-01-11T13:55:50+5:302023-01-11T14:17:43+5:30
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक रणनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिकीट तपासणी मोहीम सातत्याने हाती घेण्यात येते.
सोलापूर : रेल्वे गाड्यांमधील व स्थानकावरील फुकट्या प्रवाशांविरुद्ध व अतिरिक्त सामान घेऊन जाणार्या प्रवाशांविरुद्ध मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागाने कारवाई करण्याचा बडगा उगारला आहे. मागील वर्षभरात वरिष्ठ वाणिज्य मंडल विभागाच्या विशेष पथकाने ५ लाख ३९ हजार ५७९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून ३४ कोटी ४२ लाख ४५ हजार ४६० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक रणनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिकीट तपासणी मोहीम सातत्याने हाती घेण्यात येते. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची तिकीट तपासणी करण्यात आली. यात आढळून आलेल्या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येऊन त्यांना दंड ठोठावण्यात येतो. फुकट्यांकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडामुळे रेल्वेचे उत्पन्न वाढत असले तरी फुकट्या प्रवाशांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. तिकीट तपासणीची जबाबदारी टीसींकडे असते. मात्र, मुळात टीसींच्या संख्या कमी आहे. त्यामुळे प्रत्येक टीसीच्या वाट्याला अतिरिक्त काम येते. याचा गैरफायदा फुकटे प्रवासी घेत असतात.
अतिरिक्त साहित्य घेऊन जाणारेही रडारवर
रेल्वेतून अतिरिक्त साहित्य घेऊन जाणारे प्रवासीही आता रेल्वे अधिकाऱ्यांच्या रडारवर आहेत. सामान बक न करता रेल्वे डब्यातून जास्त वजनाचे सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जाते. मागील वर्षभरात आठ हजार २७५ जणांवर कारवाई करून १५ लाख ८८ हजार ५० रुपयांचा दंड रेल्वे प्रशासनाने केला आहे.
अनियमित प्रवाशीही वाढले...
अनियमित प्रवाशीही वाढलेच आहेत. तिकीट एका कोचचे व प्रवास दुसऱ्याच कोचने असे प्रवासी अनियमित समजले जातात. नियमानुसार, ज्या कोचचे तिकीट काढले असेल त्याच कोचने प्रवास करता येतो. रात्रीच्या रेल्वे गाड्यात सर्वाधिक विनातिकीट प्रवासी आढळून येतात असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.