शाळेतील मोफत प्रवेश प्रक्रियेस आजपासून सुरुवात; 17 मार्चपर्यंत मुदत
By शीतलकुमार कांबळे | Published: March 1, 2023 02:00 PM2023-03-01T14:00:42+5:302023-03-01T14:00:51+5:30
आधार कार्डाशिवाय मिळेल प्रवेश : 17 मार्चपर्यंत मुदत
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेशास 1 मार्च पासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये २ हजार २९७ जांगावर मोफत प्रवेश मिळणार आहे.
जिल्ह्यात 295 शाळांमध्ये आरटीई कायद्यानुसार मोफत प्रवेश देण्यात येतात. शाळेतील एकूण संख्येच्या तुलनेत २५ टक्के प्रवेश हे आरटीईतून देण्यात येतात. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार (आरटीई) विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतात. वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.
प्रवेश घेत असताना अनेक विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसले तरी त्यांना तात्पुरता प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश मिळाल्यानंतर पालकांनी लवकरात लवकर आधार कार्ड जमा करणे गरजेचे आहे.
आरटीई अतंर्गत मोफत प्रवेश घेण्यासाठी रहिवासी पुरावा (रेशनकार्ड, वीजबिल आदी), जातीचे प्रमाणपत्र (मागासवर्गीय असल्यास), दिव्यांग प्रमाणपत्र (दिव्यांग असल्यास), आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न), जन्माचा दाखला आदी कागपदत्रे द्यावे लागणार आहेत.