डिपीतील ऑइल चोरीमुळे वारंवार विद्युतपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:20 AM2021-02-15T04:20:53+5:302021-02-15T04:20:53+5:30
दोन दिवसांपूर्वी सांगोला तालुक्यातील महूद येथील एका ट्रान्सफॉर्मरमधील १७ हजार रुपये किमतीचे १७० लिटर ऑइल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची ...
दोन दिवसांपूर्वी सांगोला तालुक्यातील महूद येथील एका ट्रान्सफॉर्मरमधील १७ हजार रुपये किमतीचे १७० लिटर ऑइल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, तर शनिवारी सांगोला-कडलास रोडवरील अगदी रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑइलची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल चोरीकडे चोरट्यांनी आपला मोर्चा वळविला असल्याने महावितरणचे अधिकारी, कर्मचारी टेन्शनमध्ये आले आहेत. आता ट्रान्सफॉर्मर ऑइल चोरांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
फळबाग शेतकरी अडचणीत
ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल चोरीमुळे विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत आहे. परिणामी पिके, फळबागांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. डीपीतील ऑइल चोरांनी तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र, या ऑइल चोरट्यांचा बंदोबस्त करण्यास पोलिसांना अद्यापही यश आले नाही. ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल चोरट्यांमुळे महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनादेखील वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागत आहे.