सोलापुरातील प्राणी संग्रहालयाच्या मान्यतेसाठी पुन्हा पाठविला नव्याने प्रस्ताव
By Appasaheb.patil | Published: January 9, 2023 12:17 PM2023-01-09T12:17:43+5:302023-01-09T12:19:59+5:30
सोलापूरपासून २५० किलोमीटर अवतीभोवती एकही प्राणी संग्रहालय नाही.
सोलापूर : केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण पथकाने गेल्या आठवड्यात महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाची तपासणी केली असून असुविधा आणि निकषानुसार नसलेल्या बाबींपासून केंद्रीय समितीने प्राणी संग्रहालयाची थेट मान्यताच रद्द केली. मात्र रद्द केलेली मान्यता पुन्हा मिळविण्यासाठी महापालिकेचा पाठपुरावा सुरू आहे. यासाठी ४७ त्रुटी दूर करून पुन्हा परवानगी मिळावी यासाठी महापालिकेने नव्याने प्रस्ताव पाठविला आहे.
दरम्यान, सीझेडएच्या १०० गुणांच्या परीक्षेत किमान ३५ पेक्षा कमी गुण मिळाले त्यामुळे प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द करण्यात आली. मान्यता कायम ठेवण्यासाठी महापालिकेने अपर सचिवांकडे अपिल केले होते. याची सुनावणी घेण्यात आली. या सुनावणी दरम्यान महापालिकेने आपले म्हणणे सादर केले होते. मात्र त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. सध्या प्राणी संग्रहालयात विविध सेवासुविधा निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.
सोलापूरपासून २५० किलोमीटर अवतीभोवती एकही प्राणी संग्रहालय नाही. शहर परिसरातील विद्यार्थी, नागरिकांना पर्यटन अभ्यासाचे एकमेव प्राणी संग्रहालय आहे. मात्र तेही प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे अडचणीचे ठरले. उद्यान विभागाकडे सातत्याने करण्यात आलेल्या सोयीसुविधांबाबत महापालिकेने दुर्लक्ष केले होते. आता सीझेडएने काढलेल्या त्रुटीची पूर्तता करून पुन्हा नव्याने परवानगी मिळावी यासाठी प्रस्ताव पाठविला असल्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सांगितले.