फुलाऱ्याला मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:20 AM2021-04-14T04:20:41+5:302021-04-14T04:20:41+5:30
दक्षिण सोलापूर : भंडारकवठे येथील श्री महासिद्ध मंदिराच्या फुलाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर छत्तीस तास उलटून गेले तरी कोणाविरुद्धही गुन्हा दाखल ...
दक्षिण सोलापूर : भंडारकवठे येथील श्री महासिद्ध मंदिराच्या फुलाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर छत्तीस तास उलटून गेले तरी कोणाविरुद्धही गुन्हा दाखल झाला नाही. जखमी पिरप्पा फुलारी शुद्धीवर आला असून, सध्या तो बोलण्याच्या मनःस्थितीत नाही. पोलीस मात्र घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत.
सोमवारी पहाटे पूजेसाठी बेलपत्र आणि फुले आणायला गेलेल्या फुलाऱ्याला अज्ञात इसमाने तोंडात कापडाचा बोळा कोंबून हातपाय बांधले आणि बेदम मारहाण केली होती. या घटनेमागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलिसांनीही याप्रकरणी कोणावर गुन्हा नोंदवलेला नाही. जखमी पिरप्पा फुलारी शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. मंगळवारी तो शुद्धीवर आला; परंतु बोलण्याची त्याची मन:स्थिती नाही.
गुढीपाडव्याचा दिवस असून, श्री महासिद्ध मंदिरात पुजाऱ्यांनीच पूजा बांधली. मंदिर स्थापनेच्या इतिहासात फुलाऱ्यांशिवाय प्रथमच अशी पूजा बांधण्यात आली. फुलारी आणि पुजारी या मंदिराच्या सेवाधाऱ्यांत भक्तांकडून मिळणाऱ्या दक्षिणा, कोरडा शिधा यावरून अनेक महिन्यांपासून वाद होता. प्रकरण पोलीस ठाण्यात गेले, मात्र वाद मिटला नाही. सोमवारच्या घटनेशी काही जण या वादाचा संबंध असल्याची चर्चा करीत आहेत तर पिरप्पा फुलारी पूर्वी सावळेश्वर येथे राहत होते. ग्रामस्थ तेथील वादाचासंदर्भ जोडत आहेत. पोलिसांना फुलारी तोंड कधी उघडणार याची प्रतीक्षा आहे.
तरीही मारेकऱ्यांनी गाठलेच
पिरप्पा फुलारी यांनी दीड महिन्यापूर्वी मंद्रूप पोलीस ठाण्यात शिवीगाळ आणि मारहाण झाल्याची तक्रार दिली होती. जीविताला धोका असल्याची त्यांना भीती होती. त्यामुळेच रोज पहाटे देवाला फुले आणि बेलपत्र आणण्यासाठी नव्या शिवारात जात होते. एकाच दिशेला जाण्याचे टाळत असत तरीही सोमवारी त्यांना मारेकर्यांनी गाठलेच.
----
राजकीय वादाची झालर
भंडारकवठे ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत महासिद्ध मंदिराचे पुजारी एका राजकीय गटाचे समर्थक होते, तर फुलारी समाजाने दुसऱ्या गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. आपसातील वाद मिटत नसल्याने या दोन्ही गटांनी राजकीय नेत्यांशी जवळीक साधली होती. त्यामुळेही त्यांच्यातील वितुष्ट आणखी वाढले असावे, असाही तर्क लढवला जात आहे.
-----