सर्जन बनण्याची मजा ही काही और आहे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:22 PM2018-12-04T12:22:50+5:302018-12-04T12:25:13+5:30

वेळ दुपारी साडेबाराची. राणी (नाव बदललेले) शांतपणे घरासमोरच्या आडोशाला असलेल्या पडदीमध्ये अंघोळ करीत होती. सकाळीच रामूनं (नाव बदललेले) नवºयाने ...

The fun of being a surgeon is something else ...! | सर्जन बनण्याची मजा ही काही और आहे...!

सर्जन बनण्याची मजा ही काही और आहे...!

Next
ठळक मुद्दे- डॉ़ सचिन जम्मा यांनी केले रूग्णावर यशस्वी आॅपरेशन- महिलेचा जीव वाचविण्यात डॉ़ सचिन जम्मा यांची यशस्वी कामगिरी- अश्विनी रूग्णालयात झाले रूग्णावर उपचार

वेळ दुपारी साडेबाराची. राणी (नाव बदललेले) शांतपणे घरासमोरच्या आडोशाला असलेल्या पडदीमध्ये अंघोळ करीत होती. सकाळीच रामूनं (नाव बदललेले) नवºयाने घरात तमाशा केला होता. भांडण करून पुन्हा वर दोन थोबाडीतही दिल्या होत्या. कारण, नेहमीचंच होतं, दारूला पैसे हवे होते त्याला आणि राणीने चक्क नाही म्हणून सांगितले होते. खूप राग आला होता त्याला. दोन थोबाडीत ठेवून, दोन-चार लाथा मारून, आई-बहिणीचा उद्धार करीत निघून गेला होता तो. 

नुकतीच भाजी चिरून ठेवलेला चाकू दिसला, मग मात्र जणू त्याचं डोकंच फिरलं. चाकू उचलला. डाव्या हाताने तिचं तोंड दाबलं आणि सपासप पोटावर, छातीवर वार करायला चालू केले. क्षणभर काही कळालंच नाही राणीला. वेदनेचा डोंब उसळला होता पोटात आणि छातीत नुसता, तोंड दाबल्यामुळे ओरडताही येईना तिला. दोन्ही हातांनी दार ढकलण्याचा प्रयत्न करीत होती ती, पण आज त्याच्या अंगात राक्षस संचारला होता़ एकामागून एक वार करीत होता तो, एकदा तर दंडातून पार आरपार गेला चाकू. वेदना वाढतच होत्या, रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. पण तो काही थांबायला तयार नव्हता.

शेवटी तीव्र वेदनांनी निपचित पडली ती. तेव्हा, मेलीस का नाही अजून! असं म्हणून शेवटचा वार केला त्यानं आणि मग भिंतीवर ढकलली तिला आणि गेला पळून. राणीच्या तोंडून आवाज फुटत नव्हता. पण कसेबसे एकवटून किंचाळली ती एकदाची आणि तिची शुद्ध हरपली. डोक्यात एक प्रचंड कळ. थोडीशी वळवळ, रक्ताचे थारोळे आणि मग सारं कसं शांत शांत. राणीनं डोळे उघडले तेव्हा ती अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या सर्जिकल आय.सी.यू.मध्ये होती. नाका-तोंडात नळ्या होत्या. आजूबाजूला काही मशीन गुणगुणत होत्या. वेदना अजूनही जाणवत होत्या, पण खूपच कमी. कशा आहात आता. सुहास्यवदनाने मी विचारत होतो तिला. पाच दिवस व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या पेशंटशी बोलताना मलाच जास्त आनंद होत होता. बरी आहे डॉक्टर, हे सांगतानाही थकवा जाणवत होता तिला. पोटावर, छातीवर चिकटपट्ट्या लावलेल्या होत्या.

गेले काही दिवस खूपच वाईट होते तिच्यासाठी, पण तिला याची काहीच कल्पना नव्हती. अश्विनी हॉस्पिटलच्या तातडीच्या विभागात आणली तेव्हा अतिशय गंभीर परिस्थिती होती तिची़ न्मी तिला तपासलं आणि उडालोच. एकूण चौदा ठिकाणी भोसकलं होतं तिला़ त्यापैकी बरेचसे वार हे पोटावर होते. आता हिचं काय होणार? पटापट कामाला लागलो. आय.सी.यू.तला सगळा स्टाफ कामाला लागला. सलाईनचा मारा केला, रक्तदाब वाढविणारी औषधे चालू केली. दहा बाटल्या रक्ताची तयारी केली. पाच लाल आणि पाच पांढºया़ नातेवाईकांना तिच्या गंभीर प्रकृतीची कल्पना दिली. साहेब काहीही करा, पण वाचवा तिला. आई, भाऊ अगदी काकुळतीला येऊन सांगत होते़ सहा मुलं आहेत तिला, चार मुली आणि दोन मुलं. मोठीचं लग्न आहे हो दिवाळीनंतर. नवरा तर मेला, आता ही पण गेली तर कसं लग्न होणार तिचे? मी मात्र त्यांना स्पष्ट सांगितले.

माझ्या प्रयत्नांची शंभर टक्के गॅरंटी, पण पेशंटची अजिबात नाही. परिस्थितीच तशी होती. नशिबावर हवाला ठेवून नातेवाईकांनी परवानगी दिली आणि मी राणीला आॅपरेशनसाठी घेतलं़ आॅपरेशन करताना मोठ्या धमनीला छिद्र पडलेलं दिसलं़ त्यावरही मात केली, रक्तस्राव थांबला. आता वेळ होती लहान आणि मोठ्या आतड्यांवरच्या जखमा तपासण्याची. पाहूनच मी थक्क झालो. आतड्याला एकूण २४ भोके पडली होती. बापरे, इतक्या वाईट प्रसंगाला मीही प्रथमच सामोरे जात होतो. रात्री १० वाजता चालू झालेलं आॅपरेशन संपायला पहाटेचे चार वाजले होते. झोपही येत होती आणि थकवाही आलेला होता. पण भूलतज्ञ डॉ. विद्यानंद चव्हाण, त्यांची विद्यार्थिनी सीमा, ब्रदर नदाफ आणि सिस्टर कांबळे यांनीही तोलामोलाची साथ दिली.

राणीला व्हेंटिलेटरवर ठेवणे जरुरीचं होतं. रक्तदाब व्यवस्थित रहावा म्हणून औषधेही द्यावी लागत होती. आणखी रक्तही द्यावं लागलं, पण हळूहळू तिच्या तब्येतीत सुधारणा व्हायला लागली. तिचं नशीब बलवत्तर होतं. एवढ्या मोठ्या आघातानंतर आणि कित्येक तास चाललेल्या आॅपरेशननंतर ती बरी व्हायला लागली होती. हळूहळू बोलती झाली ती. का मारलं गं तुला एवढं नवºयांनी? मी न राहवून विचारलं तिला. चांगला होता हो साहेब तो, लाड करायचा, मला गजरा आणायचा, पोरीसाठी नवे कपडे आणायचा. पोरावर तर लई जीव व्हता त्याचा, कलेक्टर करीन म्हणायचा. पण ही दारू लई वाईट बगा, तिनंच डोस्कं फिरविलं त्याचं. बोलता बोलता डोळे बोलायला लागले तिचे. घळाघळा रडायला लागली. मग मी पुन्हा कधीही हा विषय काढला नाही.  आज आॅपरेशन करून १० दिवस झाले. पोटावरचे टाके काढता काढता दमलो मी. पण सगळ्या जखमा कशा छान भरलेल्या होत्या.

राणी दहाव्या दिवशी पूर्ण बरी होऊन घरी चालली होती. माझा स्वत:वर विश्वास बसत नव्हता. मला गेला आठवडाभर सारखे असे वाटत होते की, काहीतरी गुंतागुंत नक्कीच या आॅपरेशननंतर होणार. कारण, इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या जखमा मीही पहिल्यांदाच शिवल्या होत्या. पण नाही. तिच्या नशिबाने साथ दिली आणि राणीला दहाव्या दिवशी मी डिस्चार्ज करू शकलो. राणी माझ्या पाया पडू लागली. म्हणाली, लई चांगला डाक्टर भेटला म्हणून वाचले मी. मी मात्र खुश होतो स्वत:वर, राणीच्या नशिबावर. ‘देव तारी त्याला कोण मारी’. घरी जाताना तिच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहिले़
-डॉ़ सचिन जम्मा
 (लेखक हे लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत )

Web Title: The fun of being a surgeon is something else ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.