लॉकडाऊनऐवजी विकास कामांचा निधी आरोग्यावर खर्च करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:22 AM2021-04-08T04:22:05+5:302021-04-08T04:22:05+5:30
बार्शी: राज्यात सर्वत्र कोरोनाची संख्या वाढतेय, हे मान्य आहे. मात्र, त्यासाठी सारखं हे बंद करा आणि ते बंद करा ...
बार्शी: राज्यात सर्वत्र कोरोनाची संख्या वाढतेय, हे मान्य आहे. मात्र, त्यासाठी सारखं हे बंद करा आणि ते बंद करा असे करणे योग्य नाही. यामुळे अर्थव्यवस्था कोलमडेल. शासनाने केवळ प्रशासनावर जबाबदारी न टाकता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनाही विश्वासात घेतले पाहिजे. सरकारने असे बंद किंवा लॉकडाऊन न करता, काही विकासकामे थांबवून तो पैसा आरोग्याच्या (उपचाराच्या) सोईसुविधेवर खर्च करावा, अशी अपेक्षा आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केली.
या मागणीबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. कोणताही व्यापार, उद्योग बंद करू नये. येणाऱ्या उत्पन्नातून आरोग्य यंत्रणा सक्षम करावी. सर्व जबाबदारी अधिकारी यांच्यावर देऊ नये. प्रत्येक मतदार संघातील आमदार, प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी यांची समिती गठित करावी.
जोपर्यंत आमदार, माजी आमदार, झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, इतर लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नाहीत आणि आमदार व लोकप्रतिनिधी यांना जबाबदारी देत नाहीत, तोपर्यंत व्यवस्थितपणा येणार नाही. बोटावर मोजण्याऐवढे अधिकारी सोडले, तर कोणीही प्रामाणिकपणाने काम करीत नाही. उद्योग, व्यापार बंद पडले, तर सरकारी अधिकारी, कर्मचारी यांचा पगार होणार नाही. म्हणून लोकप्रतिनिधी यांना अधिकार देऊन कोरोनावर मात करण्यासाठी वरील उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.
---------