मैंदर्गी, दुधनीच्या विकासासाठी ८७ लाख, ३० हजारांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:15 AM2021-07-12T04:15:06+5:302021-07-12T04:15:06+5:30
अक्कलकोट : मैंदर्गी, दुधनी या नगरपालिका कार्यक्षेत्रात विकासकामांकरिता जिल्हा नियोजन समितीतून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या स्थानिक विकास निधीतून २१ ...
अक्कलकोट : मैंदर्गी, दुधनी या नगरपालिका कार्यक्षेत्रात विकासकामांकरिता जिल्हा नियोजन समितीतून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या स्थानिक विकास निधीतून २१ कामांकरिता ८७ लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती मैंदर्गीच्या नगराध्यक्षा दीप्ती केसूर व दुधनीचे नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे यांनी दिली.
आमदार फंडातून नगरपालिका क्षेत्राच्या विकासाला निधी मिळण्याची पहिलीच वेळ आहे. मैंदर्गी येथे विविध ठिकाणी हायमास्ट दिवे बसविणे, सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता बनविणे, अशा सात कामांसाठी ६२ लाखांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तसेच दुधनी येथे सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते करणे, हायमास्ट दिवे बसविणे अशा १४ कामांसाठी २७ लाख ५ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
----
मागील अनेक वर्षांपासून नगरपालिका कार्यक्षेत्राच्या विकासासाठी कधीच विकास निधी मिळाला नव्हता. केवळ ग्रामीण भागात हा निधी दिला जात होता. यंदा सचिन कल्याणशेट्टी यांच्या आमदार फंडातून प्रथमच निधी मिळत आहे. या निधीमुळे विकास कामात भर पडणार आहे.
- दीप्ती केसूर
नगराध्यक्ष, मैंदर्गी