जवानाच्या पार्थिवावर इतमामात अंत्यसंस्कार
By admin | Published: June 2, 2014 12:39 AM2014-06-02T00:39:44+5:302014-06-02T00:39:44+5:30
अपहरण करून खून : तांदुळवाडीत लष्कराची मानवंदना
बार्शी : तालुक्यातील तांदुळवाडी येथील जवान सलीम रजाक शेख (वय ३५ ) यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात व मुस्लीम धर्मशास्त्राप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले़ २९ मे रोजी पश्चिम बंगाल येथील मालदा या रेल्वे स्टेशनवरून अपहरण करून, खून करण्यात आले होते़ मालदाच्या वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन झाल्यानंतर शेख यांचा मृतदेह रविवारी सकाळी विमानाने पुण्याला आणल्यानंतर शासकीय रुग्णवाहिकेतून बेळगावच्या चार मराठा लाईट एन्फट्रीच्या युनिटमधील जवानांसोबत तांदुळवाडी येथे आणले. वडील रजाक व पत्नी जरिना यांच्यासह नातेवाईकांनी पार्थिवाचे दर्शन घेतले़ स्मशानभूमीत लष्कराच्या वतीने आर्मड सेंटर अहमदनगर येथील नाईक सुभेदार राजाराम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांना मानवंदना दिली़ नायब तहसीलदार नागेश गायकवाड, जिल्हा सैनिक बोर्डाचे कल्याण खोपडे, चार मराठा लाइट एन्फट्रीचे सुभेदार संगप्पा बाके, ग्रामस्थांच्या वतीने सरपंच अक्रुर गरड यांनी पुष्पचक्र वाहिले.यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र नवले, मेजर मच्छिंद्र पोफले, उपसरपंच चांगदेव आगलावे, शरद शिंदे, जी.एस. बेले, आण्णा कोंढारे, उमेश पाटील, मुसा शेख, सुहास पाटील, ता.पंचायत समिती सदस्य हरिश्चंद्र ननवरे, ज्ञानदेव कोंढारे, नागेश लोंढे, अमोल गरड, नातेवाईक व परिसरातील विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------
सुट्टी संपवून परतत असताना झाला घात
जवान सलीम शेख १९९८ साली बेळगाव येथील चार मराठा लाईट एन्फट्री या युनिटमध्ये भरती झाले होते व ते अरूणाचल प्रदेशातील वैशाखी येथे कार्यरत होते़ एक महिन्यापूर्वी सुट्टीवर गावी आलेले होते. रजा संपल्यानंतर परत आपल्या युनिटमध्ये हजर होण्यासाठी २५ मे रोजी बार्शी येथून दौंड मार्गे रेल्वेने निघाले होते. पण नेमणुकीच्या ठिकाणी जाण्यापूर्वीच २९ मे रोजी दुपारी १ वा़ त्यांचा मृतदेह प.बंगालमधील मालदा रेल्वे स्टेशनच्या हद्दीतील जीआरपीएफ या युनिटच्या ताब्यात असल्याची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी चार मराठा ला.एन.या युनिटला संपर्क केला.