जीव मुठीत घेऊन पाण्यातून वाट काढत अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:22 AM2021-09-25T04:22:20+5:302021-09-25T04:22:20+5:30
गेल्या दोन दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. यामुळे बोरी नदीकाठी असलेल्या आंदेवाडी (ज.) गावाला चहुबाजूने पाण्याने वेढले. यामुळे ...
गेल्या दोन दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. यामुळे बोरी नदीकाठी असलेल्या आंदेवाडी (ज.) गावाला चहुबाजूने पाण्याने वेढले. यामुळे जोडणारे दुधनी-आंदेवाडी, बोरोटी-आंदेवाडी हे दोन्ही मार्ग गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत बंद पडले. अशातच गावातल्या शावरेप्पा पुजारी (वय ६०) यांचं गुरुवारी मध्यरात्री निधन झालं. बाहेर पाऊस घरात मृतदेह पुजारी कुटुंबीयांना काहीच सूचेना. मयतासाठी साहित्य आणायचे म्हटले तर बाहेर जायला मार्गही नव्हता. चहूबाजूने पाणीच पाणी. त्यातच धनगर समाजासाठी स्मशानभूमीही नसल्यामुळे रात्र कशीबशी काढली. थोडेफार पाणी ओसरल्यानंतर अंत्यविधीच्या सामानाची जुळवाजुळव करून पुलावरील पाण्यातून जीव मुठीत घेऊन वाट काढत पुजारी यांच्या स्वत:च्या शेतामध्ये शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पाच मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
----
दोन्ही रस्त्यावरील पुलाची उंची वाढवावी. प्रत्येक समाजाला स्मशानभूमी व्हावी म्हणून शासनाकडे यापूर्वीच प्रस्ताव दिला आहे. पूल झाला असता तर पुजारी यांच्या अंत्ययात्रेसाठी पाण्यातून जीव मुठीत घेऊन जावे लागले नसते. नैसर्गिक आपत्तीच्या काळात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
- मल्लप्पा बिराजदार,
सरपंच
----
दोन वर्षांपासून आमच्या गावाला पुराच्या पाण्याने वेढा पडतो. इतर गावांशी संपर्क तुटतो. काही समाजाला स्मशानभूमी नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. गावाचे स्थलांतर करणे आवश्यक आहे.
- श्रीशैल पाटील, आंदेवाडी, पोलीस पाटील.
फोटो
आंदेवाडी (ज)येथील शावरेप्पा पुजारी यांच्या अंत्ययात्रेसाठी पुलावरील पाण्यातून वाट काढताना ग्रामस्थ.