स्मशानातील कर्तव्य पूर्ण केल्यानंतर अंत्यकर्म, श्राद्धविधी लांबणीवर टाकण्यास मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 11:44 AM2020-03-28T11:44:49+5:302020-03-28T11:48:10+5:30
पंचागकर्ते मोहन दाते यांची माहिती; धर्मशास्त्र संमत, कोरोना लॉकडाउंनमुळे केले मार्गदर्शन
सोलापूर : स्मशानातील कर्तव्य पूर्ण केल्यानंतर अंत्यकर्म व श्राद्ध हे विधी केले जातात. यासाठी अनेक लोक एकत्र येतात. तसेच या विधीसाठी गुरुजींची देखील गरज असते. मात्र, कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून असे लोक एकत्र येणे टाळणे गरजेचे आहे. म्हणून हे संकट निवळल्यानंतरही अंत्यकर्म व श्राद्ध करता येते, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शासनाने लॉकडाउनचा आदेश लागू केला आहे. १४ एप्रिलपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. या काळात घाटावरील विधी करावयाचे असल्यास लोक एकत्र येतात; पण या स्थितीत हा आजार जास्त पसरू शकतो, याचा विधी पुढे ढकलणे शक्य आहे, असे पंचांगकर्ते दाते म्हणाले. या काळात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर धार्मिक विधी करताना अडचणी येतात. यामुळे दाते यांनी हे मार्गदर्शन केले आहे.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचे वेळेवर दहन करावे लागते. मात्र, अंत्यकर्म नंतरही करता येऊ शकते. दहावा, अकरावा व बाराव्या दिवसाचे विधी करणे सगळीकडे रूढ आहे. घाटावरील विधी करताना लोक व गुरुजी न येणे या अडचणी होऊ शकतात. हे विधी संकट निवळल्यावरही करता येतात. वातावरण निवळल्यावर चार दिवस सवडीचे काढून १० ते १४ दिवसांचे कर्म अंतरीत म्हणून करता येते. हे धर्मशास्त्रास संमत आहे. मंत्राग्नी झालेला नसेल तर सर्व अस्थी विसर्जन कराव्यात आणि पुढे अंत्यकर्म करताना आधी पालाश विधी करून, मग नवव्यापर्यंतचे विधी करावेत. त्याच दिवशी दहाव्याचे कर्म करावे, घरातील दिवा अकराव्या दिवशी विसर्जित करावा, तसेच सुतक अकराव्या दिवशी संपते. त्यामुळे इतर सर्व व्यवहार, घरातील पूजा सुतक संपल्यामुळे करता येईल, असे पंचांगकर्ते दाते यांनी सांगितले.
प्रथम वर्ष श्राद्ध किंवा दरवर्षीचे श्राद्धसुद्धा जर त्या तिथीला करणे जमले नाही तर, वातावरण निवळल्यावर अष्टमी किंवा व्यतिपात किंवा अमावस्या यापैकी कोणत्याही एका दिवशी अंतरीत प्रथम वर्ष श्राद्ध किंवा दर वर्षीचे श्राद्ध करावे, असे अंतरीत श्राद्ध करणे धर्मशास्त्र संमत आहे.
- मोहन दाते, पंचांगकर्ते