अंत्ययात्रेत शिष्यांनी लेझीम खेळून गुरू माशप्पांना वाहिली श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:48 AM2020-12-05T04:48:44+5:302020-12-05T04:48:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : माजी नगरसेवक कॉ. माशप्पा विटे यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बापूजी नगरात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : माजी नगरसेवक कॉ. माशप्पा विटे यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बापूजी नगरात शोककळा पसरली. शोकाकुल वातावरणात सायंकाळी त्यांची अंत्ययात्रा निघाली. बापूजीनगर येथील नवशक्ती तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अर्थात त्यांच्या शिष्यांनी अंत्ययात्रेत लेझीम खेळून गुरूला श्रद्धांजली वाहिली.
माशप्पा विटे हे नवशक्ती तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते. लेझीम संघातील कार्यकर्त्यांना त्यांनी प्रशिक्षण दिले. त्यामुळे नवशक्ती तरुण मंडळातील कार्यकर्ते त्यांना गुरू मानत. सर्व कार्यकर्त्यांनी अंत्ययात्रेत साश्रूनयनांनी तीन तास लेझीम खेळून गुरू माशप्पा यांना अखेरचा निरोप दिला. अंत्ययात्रेत लेझीम आणि हलगीनाद सुरू असल्याने अंत्ययात्रेने सर्वांचे लक्ष वेधले. माकपचे शेकडो कार्यकर्ते अंत्ययात्रेत सहभागी होते.
विटे (५३, राहणार बापूजीनगर) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. सोलापूर महानगरपालिकेत ते तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. माकपचा बुलंद आवाज म्हणून ते महापालिकेत परिचित होते.
गुरुवारी ३ डिसेंबर रोजी माशप्पा यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यानंतर त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी बापूजीनगरात पसरली. त्यांचे अखेरचे दर्शन घेण्याकरिता माकपचे हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली.
........
चौकट
आज शोकसभा
शनिवार, ५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता बापूजी नगर येथील नवशक्ती तरुण मंडळ व्यायामशाळेत सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली आहे.
......